‘एमआरईजीएस’ठरतेय अनियमिततेचे कुरण; गावपुढारी मालामाल

rohayo workers washim.jpg
rohayo workers washim.jpg

वाशीम : गावातील मजुरांना हक्काचा रोजगार मिळावा यासाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमनोहन सिंग यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजना लागू केली होती. मात्र, ही योजना गावपुढाऱ्यांसाठी अनियमिततेचे कुरण ठरत असल्याच्या घटना समोर येत आहेत. 

मालेगाव तालुक्यातील वाघळूद ग्रामपंचायतीतील अनियमितता जिल्ह्यात गाजत असताना आता मालेगाव तालुक्यातीलच सुदी-अनसिंग गट ग्रामपंचायतीमध्ये बनावट हजेरी पत्रक बनवून तब्बल एक कोटी रुपयांची अनियमितता झाल्याचा आरोप सुमेद अशोक वानखेडे यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

तक्रारीत १५ मुद्द्यांचा उल्लेख
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत वानखडे यांनी 15 मुद्यांचा उल्लेख केला असून, या मुद्यानुसार चौकशी होण्याची मागणी केली आहे. यामध्ये ग्रामविकास कामांचा कृती आराखडानुसार विकास कामे होणे गरजेचे असताना, संबंधीत कामे ही कृती आराखड्यानुसार न होणे, रोहयोच्या कामासाठी मजुरांची मागणी नसणे, खोटे मजूर दाखविणे, पूर्वी झालेली नाला सरळीकरणाची कामे रोहयोतून केल्याचे दाखविणे,  स्मशानभूमी सौंदर्यीकरणाच्या कामात अनियमीतता, शेततळ्यावर कागदोपत्री 35 लाख रुपये खर्च दाखविणे, रोहयोच्या कामावर मयत व्यक्तींची नावे दाखवून त्यांच्या नावाने मजुरी पोटी हजारो रुपये काढणे.

निवेदनात मांडल्या बाबी
शाळकरी व अल्पवयीन मुलांना मजूर दाखविणे, एकाच मजुराला दोन कामांवर उपस्थिती दाखवून दोन वेगवेगळे जॉबकार्ड देणे, रोहयोच्या कामावर शासकीय कर्मचारी, शिक्षक, मयत व्यक्ती, अल्पवयीन मुले, तडीपार, गुन्हेगारांची नावे समाविष्ट करणे, यासोबतच लग्न करून सासरी गेलेल्या मुलींचीही नावे मजूर म्हणून दाखविणे, आदी गंभीर बाबी वानखडे यांनी निवेदनाद्वारे मांडल्या आहेत. एवढेच नव्हेतर एकाच जॉब कार्डवर 8 ते 10 व्यक्तीची बेकायदेशीर नोंद करून त्यापैकी एकाच व्यक्तीच्या नावावर सर्वांच्या रक्कमा काढण्यात आल्या आहेत.

तब्बल एक कोटी रुपयांची अनियमितता
2018-2019 व 2019 -2020 या कालाधीत गट ग्रामपंचायत सुदी-अनसिंग येथे संबंधीतांनी संगनमताने शासनाची जवळपास एक कोटी रुपयांच्या निधीची अनियमितता केली आहे. या प्रकरणात संबंधीत गटविकास अधिकारी, मालेगाव शाखा अभियंता, विस्तार अधिकारी, संबंधीत ग्रामपंचायत सचिव, सरपंच, सहाय्यक कार्यकारी अधिकारी व संबंधीत कर्मचारी यांची चौकशी तक्रारकर्त्यासमक्ष करण्यात यावी व या प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून शासनाचा पैसा वसूल करण्यात यावा, अशी मागणी सुमेध वानखडे यांनी केली आहे.

मी नुकताच प्रभार घेतला
या संदर्भात तक्रारदाराचा अर्ज मी बघितला नाही. या पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा मी नुकताच प्रभार घेतला आहे. तक्रारी संदर्भात चौकशी केली जाईल.
-सुदाम इस्कापे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती मालेगाव

चार वर्षांतील रोहयोच्या कामांची चौकशी झाली तर...
रोहयोत मालेगाव तालुक्यात सर्वाधीक अनियमितता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यासंदर्भात एका गटविकास अधिकाऱ्याला निलंबीतही व्हावे लागले आहे. या अनियमिततांमध्ये मालेगाव तालुकाच का? असा प्रश्‍न समोर येत असल्याने संपूर्ण तालुक्यातील गेल्या चार वर्षांतील कामांची चौकशी झाली तर, कोट्यवधी रुपयांच्या अनियमितता समोर येण्याची शक्यता आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी याबाबीकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com