
शेणाचा उपयोग करून झाडाचे पान लावून शेणाच्या वाटीची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा साचा येथेच बनला आहे. दोन वाट्या एक दुसऱ्यावर ठेवण्याची व्यवस्था आहे. तयार करण्यात आलेल्या बॉक्समध्ये कुंकू तसेच अक्षदासुद्धा आहे.
धारणी (जि. अमरावती) : बांबूपासून नैसर्गिक राख्या तयार करून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणाऱ्या मेळघाटच्या संपूर्ण बांबू केंद्राने कोरोनाच्या या काळात कोरोनामुक्त राख्या तयार केल्या आहेत. त्याचे वितरण देशाच्या विविध भागांमध्ये करण्यात येणार आहे.
शेणापासून तयार करण्यात आलेल्या डब्यांमध्ये या बांबूच्या राख्या राहणार आहेत. पोळ्याला ही राखी शेणाच्या वाटीसारख्या दिसणाऱ्या डब्यात टाकायची व त्यात थोडे पाणी टाकले म्हणजे काही दिवसांनी त्यातून रोपटे निघेल. हे रोपटे घराच्या अंगणात लावायचे. त्यातून निर्माण होणाऱ्या झाडामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे. राखीच्या मध्यभागी पेरू, तुळस, सदाफुली, सीताफळ आदी फळ व फुलांच्या बिया लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे राखी फेकून न देता त्यातून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होणार आहे.
मेळघाटातील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावे, त्यांच्या हाताला काम मिळावे, कुपोषण व माता मृत्यूची समस्या निकाली निघावी यासाठी संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमाने 2011 पासून मेळघाटच्या लवादा या गावात सुनील देशपांडे यांचे काम सुरू आहे.
विशेष म्हणजे मेळघाटच्या या राख्या पुणे, मुंबई, नागपूर तसेच अन्य महानगरांमध्ये तसेच काही देशांमध्येसुद्धा जातात.
अवश्य वाचा- त्याने दुसऱ्याच्या पत्नीचे स्टेटस ठेवले आणि....
यंदाच्या राख्यांमध्ये असलेली विशेषतः पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करण्यासोबतच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अनेकांच्या हाताला बळ देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यावर्षी एक लाख राख्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी अनेकांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे. विविध देशातसुद्धा या राख्या पाठविल्या जातात. त्यासाठी कच्चा माल कुठूनही विकत घेतला जात नाही. निसर्गाने आपल्याला जे दिले त्यातूनच वस्तू तयार करण्यात येतात.
शेणाचा उपयोग करून झाडाचे पान लावून शेणाच्या वाटीची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा साचा येथेच बनला आहे. दोन वाट्या एक दुसऱ्यावर ठेवण्याची व्यवस्था आहे. तयार करण्यात आलेल्या बॉक्समध्ये कुंकू तसेच अक्षदासुद्धा आहे. त्यामुळे बहिणीला इतरत्र जाण्याची गरज नाही. कुंकू व अक्षदा लावल्या की ती राखी बांधू शकते.
या ठिकाणी तयार करण्यात आलेला मास्क वेगळ्याच स्वरूपाचा आहे. त्यामध्ये एक कप्पा आहे. त्यात लवंग, कापूर व लसणाची कळी ठेवण्यात येईल. तोंड व नाकापाशी व्हायरस रोखणारे हे साधन आहे. त्यामुळे भावाची सुरक्षा होईल. नंतर बहीण भावाला राखी बांधेल.
बांबूपासून काय होऊ शकत नाही हे संपूर्ण बांबू केंद्राने दाखवून दिले आहे. ज्वेलरी, क्राफ्ट, फर्निचरपासून ते गृहनिर्माणापर्यंतचे कार्य या ठिकाणी चालते. तब्बल शंभर लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे.
आपण निसर्ग तयार करू शकत नाही. त्यामुळे तो खराब करण्याचा आपल्याला अधिकार नाही. निसर्गाने जे दिले, त्यापासूनच येथे विविध वस्तू तयार करण्यात येतात. त्यातून अनेकांना रोजगारसुद्धा मिळतो व निसर्गाचे संवर्धनदेखील होते. हाच आमच्या कार्याचा महत्त्वाचा गाभा आहे.
- सुनील देशपांडे, संचालक, संपूर्ण बांबू केंद्र, लवादा.