esakal | राज्यात जगापुर शाळेने दिला पहिला ऑनलाईन निकाल

बोलून बातमी शोधा

Jagapur School
राज्यात जगापुर शाळेने दिला पहिला ऑनलाईन निकाल
sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद ( यवतमाळ) : स्पर्धेच्या युगात खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे पालकांचा व मुलांचा कल असताना मात्र पुसद तालुक्यातील जिल्हा परिषदेची जगापूर शाळा आपल्या वेगळ्या उपक्रमासाठी प्रसिद्ध आहे. जगापूर शाळेने या वर्षी पहिली ते आठवीच्या मुलांचा निकाल १ मे ला ऑनलाईन घोषित करून एक वेगळा विक्रम केला आहे. राज्यात कोविड-१९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता या वर्षी शाळा ऑनलाईन भरविण्यात आल्या आणि वर्षाच्या शेवटी शाळेचा निकाल सुद्धा दहावी व बारावीच्या परीक्षेसारखा ऑनलाईन घोषित केल्याने शिक्षण प्रशासनाने जगापूर शाळेचे विशेष कौतुक केले.

यवतमाळ जिल्हा मुख्यालयाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या पुसद तालुक्यातील जगापूरच्या जिल्हा परिषद शाळेत पहिली ते आठवी अशा एकूण ८ वर्गाचे जवळपास १४० विद्यार्थी शिक्षण घेत असून केवळ ३ शिक्षक कार्यरत आहे. शाळेचा परिसर, शाळेची गुणवत्ता आणि विविध शालेय उपक्रमासाठी वेगळी ओळख आहे. शाळेतील आदर्श उपक्रमशील शिक्षक जगदीश जाधव हे 19 वर्षांपासून शाळेत कार्यरत असून त्यांनी खडकाळ जमिनीवर एक इको फ्रेंडली आणि उपक्रमशील शाळा बनविण्याची मोठी किमया केली आहे. सदैव शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, खेळ व क्रीडा या संपूर्ण प्रकारात शाळा उत्कृष्ट कार्य करताना पाहायला मिळते. शाळेमध्ये शिक्षकांचा अभाव असला तरी शाळेचे मुख्याध्यापक जगदीश जाधव, पदवीधर शिक्षक महेश सूर्यवंशी आणि स.शिक्षक नागेश जोगदे हे अभिनव उपक्रम सहज राबवितात.

हेही वाचा: बोगस बियाण्यांच्या वाहतुकीला लावा लगाम : पालकमंत्री संदीपान भुमरे

लॉकडाऊन मध्ये मागील वर्षापासून संपूर्ण राज्यात प्रत्येक शिक्षक राबवित असलेला ऑनलाईन टेस्ट हा उपक्रम ३ वर्षां पूर्वी जगापूर शाळेने राज्याला दिलेला उपक्रम आहे. जगापूर शाळेने ऑनलाईन टेस्ट करण्यासंदर्भात राज्यातील शेकडो शिक्षकांना त्यावेळेस मार्गदर्शन सुद्धा केले आहे. ३ वर्षापूर्वीच्या ऑनलाईन टेस्ट उपक्रमासोबतच ऑनलाईन निकालसुद्धा संपूर्ण राज्यासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम आहेत.

जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रमोद सुर्यवंशी (शिक्षणाधिकारी प्राथमिक) यांच्या प्रेरणेने आणि पुसद पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे, पुसद आय.टी. सेलचे प्रमुख तथा केंद्रप्रमुख अमित बोजेवार, तसेच शेंबाळपिंपरी केंद्रप्रमुख प्रकाश टेकाळे यांच्या सहकार्याने जगापूर शाळेने ऑनलाईन निकाल तयार करून प्रसारित केला. हा निकाल हाती मिळताना शाळकरी विद्यार्थी आनंदित झाले. यासाठी मुख्याध्यापक जगदीश जाधव, महेश सूर्यवंशी व तंत्रस्नेही शिक्षक नागेश जोगदे यांनी विशेष प्रयत्न केले.