संवाद सभेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सोडला संकल्प; आशा पल्लवित

मंगेश वणीकर
Sunday, 7 February 2021

जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री यांनी आजनसरा बॅरेज प्रकल्पाला तब्बल दोन दशकानंतर नवसंजीवनी देऊन तो पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर केला.

हिंगणघाट (जि. वर्धा) : दोन दशकांपासून तालुक्‍यातील आजनसरा प्रकल्प पूर्णत्वास जाण्याच्या प्रतीक्षेत आहे. अनेकांनी तो पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले पण, त्याचे काम झाले नाही. यातच जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथील संवाद सभेत हा प्रकल्प पूर्णत्त्वास नेण्याचा संकल्प सोडल्याने या प्रकल्पाला नवसंजीवणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

तालुक्‍यातील वर्धा नदीवरील आजनसरा बॅरेज प्रकल्पाचे उद्‌घाटन तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते व तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष स्व. प्रमोद शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता. या प्रकल्पामुळे तालुक्‍यातील २८ हजार हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्याचा हा महत्वाकांक्षी असा जलसंपदा विभागाचा प्रकल्प होता. यानंतर हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिला.

अधिक माहितीसाठी - नितीन गडकरी म्हणाले, दोन महिन्यांत नागपूर विभाग डिझेलमुक्‍त करणार; इथेनॉलवर चालणार वाहने

निवडणुकीपुरते व प्रसिद्धीसाठी निवेदने देणे व त्याचा पुढे कुठलाही पाठपुरावा न करणे, हे नित्याचेच झाले. आजनसरा प्रकल्प चेष्टेचा विषय झाला. या बॅरेजच्या लाभक्षेत्रात असलेल्या शेतजमिनीवरील विक्रीच्या बंधनाची अधिसूचनासुद्धा शासनाकडून रद्द करून घेण्यात आली. राज्याचे जलसंपदामंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त वर्धा जिल्ह्यात आले. वर्धेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभेत, आजनसरा बॅरेज प्रकल्पाचे आपण पुनर्जिवन करण्याचे जलसंपदा विभागाला आदेश दिले.

२०२४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचा जलसंपदा विभागाचा महासंकल्पच असल्याचे पाटील यांनी जाहीर केले. त्यासाठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही. आपण पुन्हा या जिल्ह्यात येऊ, त्यावेळी या प्रकल्पाची किती प्रगती झाली, हे आपणाला प्रत्यक्ष सांगू, असे जाहीर करून आजनसरा प्रकल्पाच्या पूर्ततेवर एक प्रकारे त्यांनी शिक्कामोर्तब केले.

जाणून घ्या - आधार कार्ड काढताय? थांबा १५ दिवस!

जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री यांनी आजनसरा बॅरेज प्रकल्पाला तब्बल दोन दशकानंतर नवसंजीवनी देऊन तो पूर्ण करण्याचा संकल्प जाहीर केला. त्याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रा. दिवाकर गमे यांनी पक्ष व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jayant patil said Ajansara Barrage Project gets revitalization