esakal | वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दागिन्यांसह रोख लंपास, पोलिसांत तक्रार दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

चोरी

वृद्ध दाम्पत्याचे हातपाय बांधून दागिन्यांसह रोख लंपास, पोलिसांत तक्रार दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूल (जि. चंद्रपूर) : वृद्ध दाम्पत्याचे हातपाय दोरीने बांधून चोरट्यांनी घरातील दागिने आणि रोख रक्कम पळविल्याची घटना मंगळवारी (ता. ३) चांदली बूज (chandali booj of mool) येथे उघडकीस आली. याप्रकरणी सावली पोलिस ठाण्यात (saoli police station chandrapur) तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सकाळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, काही अंतरावरून श्वान पथक परत आले.

हेही वाचा: पोलिसांनी सर्वांसमोर केली मारहाण; अपमानित झाल्याने आत्महत्या

चांदली बूज येथे मनोहर टेप्पलवार आणि त्यांच्या पत्नी कुसूमबाई टेप्पलवार हे वृद्ध दाम्पत्य राहते. त्यांच्या घरी त्यांचे सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे. पतीला कमी ऐकू येत असल्याने दुकानाचे कामकाज पत्नीच सांभाळते. सोमवारी (ता. २) रात्री जेवण करून दाम्पत्य झोपले. अचानक रात्री एक वाजताच्या दरम्यान घरात प्रवेश करून एका व्यक्तीने कुसूमबाई यांचे उशीने तोंड दाबले. एकाने दोन्ही हात पकडून दोरीने बांधले. तसेच एका माणसाने पाय बांधले. कुसूमबाई आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न करीत असताना बाजूच्या बेडवर झोपलेल्या पतीलासुद्धा पकडून ठेवले. चार लोकांनी या वृद्ध दाम्पत्याला पकडून ठेवून पैसे आणि दागिन्यांची मागणी केली. नाहीतर मारण्याची धमकी दिली. आलमारीकडे इशारा केल्यानंतर एकाने आलमारीतील चिल्लर पैशांचा डब्बा काढला. गादी खाली ठेवलेले आठ हजार रुपये जबरदस्तीने हिसकावले. घरातून आठ हजार पाचशे रुपये, गळयातील सोन्याचे तीन ग्रॅमचे मंगळसूत्र, सोन्याचे दोन ग्रॅमचे कानातील बारी असे एकूण पाच ग्रॅमचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविले. पळून जाताना पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास तुम्हाला व तुमच्या मुलांना मारून टाकण्याची धमकीही चोरट्यांनी दिली. मंगळवारी (ता. ३) सकाळी कुसूमबाई मनोहर टेप्पलवार यांनी सावली पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. चंद्रपूर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली.पुढील तपास सावली पोलिस करीत आहेत.

हृदयविकाराच्या धक्क्याने बहिणीचा मृत्यू

बहिणीच्या घरी चोरी झाल्याचे पाहून शेजारी राहणाऱ्या लहान बहिणीचा मंगळवारी (ता. ३) सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सुमनबाई मधुकरराव येनगंटीवार असे मृत महिलेचे नाव आहे. याविषयी चांदली बूज येथे हळहळ व्यक्त होत आहे.

loading image
go to top