मतदानाला फाटा; विषय समित्या बिनविरोध

 zp_standing.jpg
zp_standing.jpg

अकोला : मिनी मंत्रालयाच्या दहा विषय समित्यांवर सदस्यांची निवड प्रक्रिया मंगळवारी (ता. 11) जिल्हा परिषदेत पार पडली. यावेळी मतदानाला फाटा देवून सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. परंतु त्यासाठी सत्ताधाऱ्यांना स्वपक्षातील सदस्यांनाच निवडणुकीतून माघार घेण्यासाठी विनवणी करावी लागली. काही सदस्यांना आवडीच्या समितीचे सदस्य पद मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळाली. त्याआधी निवडणुकी ऐवजी समिती सदस्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी भारिप-बमसंसह विरोधकांना एकाच ठिकाणी बसून रणनिती आखावी लागली. 

जिल्हा परिषदेतील दहा विषय समितींच्या रचनेसाठी मंगळवारी (ता. 11) दुपारी 1 वाजता जिल्हा परिषदेच्या राजश्री छत्रपती शाहू महाराज सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. त्याआधी सकाळी 11 वाजतापासून दुपारी 1 वाजेपर्यंत विषय समित्यांमध्ये सदस्यांची निवड करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच सभा सुरू होणे अपेक्षित असल्यानंतर सुद्धा तब्बल 2 तास 10 मिनीटांनी (दुपारी 3.10 वाजता) अध्यक्ष प्रतीभा भोजणे, उपाध्यक्ष सावित्री राठोड यांच्यासह इतर सभापतींचे सभागृहात आगमन झाले. त्यानंतर सभेला सुरूवात झाली.

10 ते 15 मिनीटातच अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती चंद्रशेखर पांडे गुरूजी सभागृहातून बाहेर पडले. त्यानंतर तब्बल अडीच तास सभागृहात केवळ सदस्यांची उपस्थिती होती. सदस्य पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी व सभापतींना खात्यांचे वाटप करण्यासाठी नियोजनच न झाल्याने अध्यक्ष, उपाध्यक्षांसह इतर सभापती व भारिपचे प्रदेश प्रवक्ता धैर्यवर्धन फुंडकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात बंद द्वार चर्चा केली.

सभापतींना खाते वाटप व समिती सदस्यांच्या निवडीवरून एकमत न झाल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये अडीच तास चर्चेच्या फैरी सुरूच राहिल्या. त्यानंतर सायंकाळी 6.22 वाजता अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व समित्यांच्या सभापतींचे सभागृहात आगमन झाले. पश्‍चात अध्यक्षांच्या परवानगीने सभेचे सचिव व प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी समित्यांच्या सदस्यांची नावे जाहीर केली. त्यामुळे यंदा एकाच दिवशी जिल्हा परिषदेच्या सर्वच समिती सदस्यांनी निवड बिनविरोध करण्यात आली. 

स्व. बाबासाहेब धाबेकरांना वाहिली श्रद्धांजली
विषय समिती सदस्यांच्या निवडीसाठी आयोजित सभेला सुरूवात होताच शिवसेनेचे सदस्य गोपाल दातकर यांनी माजी कॅबिनेट मंत्री व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब धाबेकर यांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. यामुळे सभागृहात स्व. बाबासाहेब धाबेकरांना दोन मिनीट मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

सकारात्मक चर्चेमुळे टळली निवडणूक
विषय समिती सदस्यांच्या निवडणुकीसाठी भारिप-बमसंच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांसोबत आधीच चर्चा केली होती. त्यामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी व इतर पक्षांच्या गटनेत्यांमध्ये ‘फॉर्मुला’ सुद्धा ठरला होता. सत्ताधाऱ्यांनी त्या फॉर्मुल्यावर अंमलबजावणी केल्यामुळे सदस्य पदाची निवडणूक टळली. 

‘स्थायी’ व ‘समाज कल्याण समिती’वर अडले होते घोडे
जिल्हा परिषदेच्या स्थायी व समाज कल्याण समितीच्या सदस्य पदावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. शिवसेनेने दोन सदस्य पदासह अपक्ष उमेदवार गजानन फुंडकर यांना स्यायी समितीचे सदस्यपद मागितले. परंतु अपक्ष उमेदवाराला शिवसेनेने स्वतःच्या कोट्यातील एक पद द्यावे, अशी भूमिका सत्ताधारी भारिपने घेतली. परंतु त्यावर सुरूवातीला एकमत झाले नाही. परंतु काही वेळानंतर भारिपच्या एका सदस्याला वगळून अपक्ष फुंडकर यांची स्थायी समितीमध्ये निवड करण्यात आली. समाज कल्याण समितीच्या सदस्य निवडीवरून सुद्धा भारिपच्या सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली. 11 जागांसाठी 14 अर्ज मिळाल्याने सत्ताधारी भारिपच्या सदस्यांमध्येच समितीमध्ये जाण्यावर स्पर्धा पाहायला मिळाली. परंतु शेवटी भारिप-बमसंच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे दोन समिती सदस्यांच्या निवडीवरुन जिल्हा परिषदेत राजकारण रंगताना दिसून आले. 

सभापतींना खात्यांचे वाटप
जिल्हा परिषदेच्या सभेत अध्यक्ष प्रतिभा भोजने यांनी उपाध्यांसह दोन सभापतींना खात्यांचे वाटप केले. तर यापूर्वी झालेल्या निवडणुकीत दोन सभापतींची निवड करण्यात आली होती. 

पदनाम                                               खाते/समिति
सावित्रीबाई राठोड (उपाध्यक्ष)      -    आरोग्य व अर्थ (वित्त)
चंद्रशेखर पांडे गुरूजी (सभापती)   -    बांधकाम व शिक्षण
पंजाबराव वडाळ  (सभापती)       -    कृषी व पशुसंवर्धन
आकाश सिरसाट (सभापती)        -    समाज कल्याण
मनिषा बोर्डे (सभापती)              -    महिला व बाल कल्याण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com