जिल्हा परिषदेच्या शाळा होणार बंद

school-band.jpg
school-band.jpg

अकोला : महाविकासआघाडी सरकारच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या शिक्षण विभागाने राज्यातील ९१७ वस्तिशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील सुमारे ४ हजार ८७५ विद्यार्थ्यांना इतर शाळेत समायोजन केले जाणार आहेत. सरकारच्या शालेय विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील एक ते पाच विद्यार्थी संख्या असलेल्या १६ शाळांपैकी ९ शाळा बंद होण्याची शक्यता आहे. 

शिक्षणहक्क कायद्यानुसार (आरटीई) बालकांना त्यांच्या घरापासून ० ते ३ किलोमीटर अंतराच्या आत मोफत प्राथमिक शिक्षणासाठी शाळा उपलब्ध व्हावी, अशी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने काही वस्तिशाळा निर्माण केल्या होत्या. मात्र, अनेक ठिकाणी घराजवळ शाळा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहे. त्यासोतच गेल्या सरकारने शाळेतील पटसंख्या कमी झाल्याने, त्या शाळा समायोजन करण्याच्या नावाखाली बंद केल्या. त्यामुळे आता शाळा उपलब्ध होत नसल्याने, वाहतूक सुविधेचे प्रयोजन केले आहे.

तावडे शिक्षणमंत्री असताना, त्यांनी शाळांचे समायोजन करण्याच्या नावाखाली सुमारे १३०० शाळा बंद करण्याचे धोरण अवलंबले होते. त्याअंतर्गत दुर्गम भागातील कमी पटसंख्या असलेली शाळा बंद करायची आणि त्या शाळांमधील विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत जाण्यासाठी वाहतूक भत्ता द्यायचा, असा निर्णय झाला होता. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला सामजातील सर्व स्तरांतून विरोध झाल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया मागे पडली. मात्र, आता राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी वर्षा गायकवाड यांनी स्विकारली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार, सरकारच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार ज्या क्षेत्रांमध्ये शाळा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी स्थानिक प्राधिकरणाने लहान वस्तीतील बालकांना प्राथमिक शिक्षण घेण्याची सोय होण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करावी. त्याअंतर्गत राज्यातील ९१७ वस्तिस्थळे (वस्तिशाळा) निश्चित करण्यात आली असून, त्यातील ४ हजार ८७५ विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याची आहे. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील एक ते पाच विद्यार्थी संख्या असलेल्या १६ शाळांपैकी ९ शाळा बंद होण्याची शक्यता आहे. 

या शाळा होणार बंद
जिल्ह्यातील १६ शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संख्या १ ते ५ असून, यापैकी ९ शाळा बंद होण्याची शक्यता आहे. या १६ शाळांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अलियाबाद,  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मूर्तिजापूर, जि.प. प्राथमिक शाळा साकिनी, जि.प. प्राथमिक शाळा धोतरखेड, जि.प. प्राथमिक शाळा मिर्झापूर, जि.प. प्राथमिक शाळा लसनपूर, जि.प. प्राथमिक शाळा मोहखेड, जि.प. प्राथमिक शाळा टाकवडा, जि.प. प्राथमिक शाळा खरबाडी, जि.प. लोअर प्राथमिक शाळा, शिताळा, जि.प. प्राथमिक शाळा आरखेड, जि.प. लोअर शाळा कलमखेड, जि.प. मराठी शाळा कुरुम, जि.प. प्राथमिक शाळा जामठी खुर्द, जि.प. प्राथमिक उर्दू शाळा मळसूरचा समावेश आहे. एका शाळेत तर शून्य विद्यार्थी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com