अटी आणि शर्थींवर सुरू झाली मेळघाटातील जंगल सफारी 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

सद्य:स्थितीत ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, नियमानुसार मेळघाटातसुद्धा लॉकडाउननंतर पर्यटनावर बंदी होती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या स्थानिक लोकांचा रोजगार व त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे विपरीत परिणाम झाला होता.

अमरावती  : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ब्रेक लागलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील जंगल सफारीला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. वरिष्ठ स्तरावरून पर्यटकांसाठी आखून दिलेल्या अटी व शर्थीनुसार या जंगल सफारीला मंजुरी मिळाली असून शुक्रवारी, 19 जूनपासून मेळघाटातील पर्यटन व जंगल सफारीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. 

सद्य:स्थितीत ज्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, नियमानुसार मेळघाटातसुद्धा लॉकडाउननंतर पर्यटनावर बंदी होती. त्यामुळे यावर अवलंबून असलेल्या स्थानिक लोकांचा रोजगार व त्यांच्या कुटुंबीयांवर ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे विपरीत परिणाम झाला होता. एन.टी.सी.ए. व जनप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार, राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांचा नुकताच दोन दिवसीय दौरा व्याघ्रप्रकल्पामध्ये झाला. त्यांनी निसर्ग पर्यटनाला चालना मिळावी, स्थानिकांच्या रोजगाराचे प्रश्‍न मार्गी लागावे. या अनुषंगाने निसर्ग पर्यटन सुरू करण्यासाठी सुचविले होते. त्याच अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीलाही मंजुरी मिळाली.

त्यानुसार शुक्रवारपासून (ता. 19) मेळघाट व्याघ्रप्रकल्प, ज्ञानगंगा वन्यजीव अभयारण्य, काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य, लोणार वन्यजीव अभयारण्य व टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यात निसर्ग पर्यटन सुरू करण्याचे निश्‍चित धोरण आखले गेले. येत्या काळात पर्यटन करणाऱ्यांची पूर्वीच्या इतिहासाची नोंद प्रवेशद्वारावरच घेतली जाईल. शिवाय थर्मल स्क्रिनिंग करून नियमित नोंदवही तयार होणार आहे. स्वस्थ पर्यटकांनाच आत जाण्याची परवानगी मिळेल. पर्यटकांची स्क्रिनिंग ही आरोग्य विभागाकडून प्रशिक्षित केलेल्या कर्मचाऱ्यांकडून केली जाईल. शिवाय पर्यटकांच्या परतीच्याही नोंदी आता घेतल्या जातील. 

अवश्य वाचा- लग्नाचे आमीष दाखवून केले शोषण, परंतु ऐनवेळी घेतली ही भूमिका

वनविभागातर्फे सुरू असलेल्या खुल्या बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम लागू करण्यात आले आहे. 20 ऐवजी आता 14 पर्यटक व एक गाइड अशी व्यवस्था राहील. जी वाहने जंगल सफारीसाठी आत जातील त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाईल. पर्यटकांसाठी मास्कचा वापरही बंधनकारक करण्यात आला आहे. 

गाइडच्या मानधनात वाढ 

व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाचे क्षेत्र लक्षात घेता, येथे जवळपास दीडशे गाइड सुविधेसाठी उपलब्ध आहेत. त्याचे मानधन तीनशे रुपयांवरून साडेतीनशे रुपये करण्यास वनविभागाने मान्यता दिली आहे. 

लॉकडाउननंतर व्याघ्रप्रकल्पात पर्यटनबंदी लागू करण्यात आली. दर महिन्याला पर्यटनातून सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न होत होते. गेल्या तीन महिन्यांचा विचार केल्यास तीस लाखांचे नुकसान झाले. 
- विशाल माळी, विभागीय वनअधिकारी, मेळघाट व्याघप्रकल्प, अमरावती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The jungle safari in Melghat started on terms and conditions