न्या. विकास सिरपूरकर करणार हैदराबाद एन्काउंटरची चौकशी 

Sirpurkar
Sirpurkar

नागपूर : हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली असून सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती आणि नागपूरचे न्या. विकास सिरपूरकर हे या आयोगाचे प्रमुख असतील. आयोगाला सहा महिन्यांत चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करायचा आहे.
|
आयोगाला सहा महिन्यांची मुदत 
देशभरात गाजलेल्या हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी आज (ता. 12) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सत्य जाणून घेण्याचा अधिकार लोकांना आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याची आवश्‍यकता आहे, असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्पष्टपणे नमूद केले.

तुम्हाला पोलिसांविरोधात गुन्हेगारी खटला चालवायचा असेल तर आम्ही कोणताही आदेश देणार नाही, असेही त्यांनी राज्याच्या पोलिस विभागाला सांगितले. तसेच बलात्काराचा आरोप असेलेल्या आरोपींच्या एन्काउंटरच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय समिती गठित केली. यात नागपूरकर विकास सिरपूरकर यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्ती रेखा बलदोटा आणि सीबीआयचे माजी अधिकारी कार्तिकेयन यांचा समावेश आहे. 

न्या. सिरपूरकर यांची 12 जानेवारी 2007 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाली. तत्पूर्वी, नागपूर शहरात वकिली करताना त्यांची 1992 साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर डिसेंबर 1997 साली त्यांची मद्रास उच्च न्यायालयात बदली झाली.

25 जुलै 2004 ते 19 मार्च 2005 या काळात ते उत्तराखंड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश होते. कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून 20 मार्च 2005 ते 11 जानेवारी 2007 पर्यंत त्यांनी जबाबदारी सांभाळली. 12 जानेवारी 2007 ते 21 ऑगस्ट 2011 पर्यंत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होते. येथे साडेचार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून वयाच्या 65 व्या वर्षी ते निवृत्त झाले.

जबाबदारी योग्यपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न
या आयोगाचा प्रमुख म्हणून मला काम बघायचे आहे. अशा घटनांची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची रीतसर चौकशी करणे माझी नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी योग्यपणे पार पाडण्याचा माझा प्रयत्न राहील. 
- न्या. विकास सिरपूरकर, माजी न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालय
 

न्या. सिरपूरकरांचे उल्लेखनीय निकाल 
न्या. विकास सिरपूरकर यांनी दिलेल्या उल्लेखनीय निकालांमध्ये पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद याला दिलेल्या फाशीच्या शिक्षेचा समावेश आहे. दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील आरोपी आरिफ ऊर्फ अशफाक याच्यावरील खटल्याचा निकाल देणाऱ्या खंडपीठात न्या. टी. एस. ठाकूर यांच्यासमवेत त्यांचा सहभाग होता.

विशेष उल्लेखनीय म्हणजे, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त कार्यालयामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सेवा ग्राहक संरक्षण अधिनियम 1986 च्या अंतर्गत "सेवे'च्या कक्षेत येतील आणि पीएफ योजनेचा ग्राहक या कायद्यांतर्गत "ग्राहक' असेल, असा निर्णयही त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com