ज्योती सुभाष म्हणतात, दलवाईंच्या मार्गावर आज वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

नागपूर  : तिहेरी तलाकसंदर्भात नुकताच निर्णय झाला. बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायद्याबाबत हमीद दलवाई यांनी त्या वेळीच भाष्य केले होते. हमीद दलवाई मुस्लिम समाजासाठी काम करीत होते. मात्र, मुस्लिम समाजच त्यांच्या विरोधात उभा राहिला. ते आपल्या भल्यासाठी काम करीत आहेत, याची जाणीव त्यावेळच्या मुस्लिम समाजाला नव्हती. हमीद यांनी मार्ग दाखविला. आज 50 वर्षांनंतर त्याच मार्गावर समाज पुढे जातो आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका ज्योती सुभाष यांनी व्यक्त केले.

टॉकटेल समूहातर्फे मुस्लिम समाजसुधारक, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक हमीद दलवाई यांचे जीवनकार्य उलगडणारा "हमीद दलवाई-द अनसंग ह्युमानिस्ट' या माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित केले होते. यावेळी त्यांनी या माहितीपटाच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. अजेय गंपावार यांनी त्यांच्याशी संवाद साधला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, "वनामती'चे रवींद्र ठाकरे उपस्थित होते. या माहितीपटाची निर्मिती, लिखाण आणि दिग्दर्शन ज्योती सुभाष यांनी केले. तर ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा, ज्योती सुभाष यांच्यासह अमृता सुभाष, हमीद दाभोलकर, क्षितिज दाते यांनी हा माहितीपट आपल्या संवादातून उलगडला. कोकणातील चिपळूणजवळील मिरजोळी या दलवाई यांच्या मूळ गावी या माहितीपटाचे पहिले चित्रीकरण पार पडले.
ज्योती सुभाष म्हणाल्या, नसिरुद्दीन शहा यांच्यासारखा चांगला लेखक आणि संवेदनशील अभिनेता मला लाभल्याने हमीद यांचा विचार आणि कार्य लोकांपर्यंत पोहोचले, याचे समाधान वाटते. हमीद दलवाई यांचा आवाज मला कुठेही रेकॉर्ड केलेला मिळाला नाही. त्यामुळे नसिरुद्दीनच्या आवाजाने तो फिल यात घेता आला. प्रत्येक माणसात एक प्राणतत्त्व असते. या प्राणतत्त्वाचे वर्णन करता येत नाही. या तत्त्वामुळेच माणसे विशिष्ट ध्येयाने प्रेरित होतात आणि त्यांना ते कार्य पूर्ण करण्याचा ध्यास लागतो. असेच प्राणतत्त्व हमीद दलवाई यांच्यात होते. त्यांच्या कार्याने मी प्रभावित झाले म्हणून हा माहितीपट निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. संचालन वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले. आयोजनासाठी सुखदा चौधरी, रूपेश पवार आदींनी सहकार्य केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jyoti Subhash says, 'Today we will walk on the path of Dalwai