esakal | कमलकिशोर फुटाणे म्हणाले, पोषणमुक्तीचे अभियान जनआंदोलन व्हावे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कमलकिशोर फुटाणे म्हणाले, पोषणमुक्तीचे अभियान जनआंदोलन व्हावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोषणमुक्तीचे अभियान जनआंदोलन व्हावे
नागपूर : माता व बालकाला पोषक आहार आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी, कुपोषणमुक्तीसाठी माता-बालक पोषण अभियान अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्वस्तरावर हे अभियान जनआंदोलन होऊन प्रत्येक मूल कुपोषणमुक्त व्हावे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात रविवारी पोषण अभियानाचे उद्‌घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी महिला बालविकास अधिकारी भागवत तांबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अनिल किटे यांची उपस्थिती होती. माता व बालकांना सशक्त करण्यासाठी राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत पोषण अभियान राबविण्यात येत आहे. माता व बालक पोषण आहार अभियान मिशन मोडवर राबवून ग्रामीण भागात या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधावा. पोषण आहार हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे, असेही फुटाणे यांनी सांगितले.
पोषण आहार अभियानाअंतर्गत जिल्ह्यात महिनाभर विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. या अभियानाअंतर्गत जनजागृतीसाठी प्रभातफेरी, दिंडी, विविध स्पर्धा, पोषण मेळावे राबविले जाणार आहेत. पोषण अभियानाद्वारे प्रामुख्याने पोषण आहार व त्याचे महत्त्व, स्तनपान, ऍनेमिया आजार, वैयक्तिक स्वच्छता या विषयावर लक्ष देण्यासाठी प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे पोषण आहार, चांगल्या आरोग्याच्या सेवेचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून कुपोषण निर्मूलनाकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे महिला बालविकास अधिकारी भागवत तांबे यांनी सांगितले.

loading image
go to top