विदर्भातील संत्रा विमानाने थेट दुबईला

भूपेश बारंगे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

कारंजा (जि. वर्धा) - येथील महाऑरेंज प्रकल्पाच्या मदतीने पुणे येथील एसडीएफ  कंपनीने शेतकऱ्यांकडून आलेला विदर्भातील संत्रा थेट विमानाने दुबईला पाठविला. महाऑरेंजमध्ये थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या संत्र्यावर प्रक्रिया व व्यवस्थित  पॅकिंग करून तो विदेशात विकला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत आहे. 

कारंजा (जि. वर्धा) - येथील महाऑरेंज प्रकल्पाच्या मदतीने पुणे येथील एसडीएफ  कंपनीने शेतकऱ्यांकडून आलेला विदर्भातील संत्रा थेट विमानाने दुबईला पाठविला. महाऑरेंजमध्ये थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या संत्र्यावर प्रक्रिया व व्यवस्थित  पॅकिंग करून तो विदेशात विकला जात आहे. परिणामी, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत आहे. 

विदर्भातील संत्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे. नागपुरी संत्रा अशी ओळख त्याला प्राप्त झाली आहे. नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील वरुड, मोर्शी, काटोल, नरखेड, कारंजा (घा.), आष्टी (शहीद) यासह अनेक तालुक्‍यांत संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. शेती सिंचनाखाली नसल्यामुळे त्यांना मुबलक पाणी उपलब्ध होत नाही. अशा संकटांचा सामना करीत संत्र्याचे उत्पादन घेतले जात आहे. 

येथील महाऑरेंज केंद्रात विदर्भातील विविध भागांतून संत्रा येतो. महाऑरेंजच्या केंद्रावर प्रक्रिया, उत्कृष्ट पॅकिंग करून हा संत्रा परदेशात पाठविला जातो. यापूर्वी आखाती देश, श्रीलंका, बांगलादेश येथे संत्रा पाठविण्यात आला. अलीकडे मृगबहराचा संत्रा दुबई येथे विमानाने पाठविण्यात आला. दुबईत पाठविलेला संत्रा उत्तम दर्जाचा असल्यामुळे शेतकऱ्यांना टनामागे ४८ हजार रुपये भाव मिळाला. महाऑरेंजच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांपासून माल खरेदी करून चांगला भाव मिळून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दर्जेदार संत्रा उत्पादनाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरिता लवकरच शासनातर्फे महाऑरेंजला १५ कोटी मिळणार आहेत. या माध्यमातून संत्रा उत्पादनाचा दर्जा आणखी सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

 महाऑरेंजमध्ये संत्रा थेट शेतकऱ्यांकडून घेतला जातो. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. संत्र्याला स्वच्छ पाण्याने धुतले जाते. त्यावर एक लेप चढविला जातो. ज्यामुळे संत्र्याला चमक मिळते. सोबतच टिकाऊपणाही वाढतो. आकारमानानुसार ग्रेडिंग करून पॅकिंग केले जाते.  आकर्षक पॅकिंग आणि दिसायला सुंदर असलेल्या या संत्र्याला विदेशात चांगला भाव मिळण्यास मदत होते. 
- श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाऑरेंज, कारंजा

Web Title: karanja vidarbha news orange export to dubai