आयटीतील स्वदेशी वाट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

डिलिव्हरिंग चेंज फोरमच्यावतीने भारतात २४ आणि २५ जानेवारीला मुंबईत आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. जगभरात उद्योग, प्रशासन, कला आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेत्रदीपक बदल घडविणाऱया 'चेंज मेकर्स'चा सहभाग हे परिषदेचे वैशिष्ट्य आहे. दोन दिवसांच्या परिषदेत विविध विषयांवर चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि ज्ञानाची देवाण-घेवाण होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर 'सकाळ' समुह महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करीत असलेल्या क्षेत्रांमध्ये नेमके काय घडते आहे, काय घडवावे लागेल याचा विभागनिहाय आढावा घेत आहोत.
डिलिव्हरिंग चेंज फोरम
२४ व २५ जानेवारी २०१७ 
नेहरू सेंटर, मुंबई
अधिक माहिती व सहभागासाठी क्लिक करा
www.deliveringchangeforum.com

झपाट्याने विकसित होत असलेल्या आयटी क्षेत्रात कल्पक आणि उद्यमी तरुणांची मुशाफिरी आहे. या क्षेत्रात काही करण्याची इच्छा असलेला धडपडा तरुण आधुनिकतेचा मार्ग आत्मसात  करण्याच्या घाईत असतो. या प्रयत्नात काही जण यशस्वी होतात; पण पुढे निघूनसुद्धा आपल्या मातीसाठी झिजल्याचे त्यांचे समाधान कुठे हरवून जाते. केतन मोहितकर नावाचे धडपडे व्यक्तिमत्त्व याला अपवाद आहे. मोहितने वयाच्या २५ व्या वर्षी स्वतःचा ‘सॉफ्टवेअर’ व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्नच बघितले नाही तर लोकसेवेचा ध्यासही जोपासला. आपले कौशल्य केवळ भारतीय नागरिक आणि देशी कंपन्यांसाठी खर्ची घालण्याचा ठाम निश्‍चय करून तशी संहिता तयार केली. 

सामान्यपणे सॉफ्टवेअर क्षेत्रात कंपनी थोडी मोठी झाली की, बाहेरच्या देशातील कामे मोठ्या प्रमाणावर मिळवण्याचा प्रयत्न असतो. मग देशातील कंपन्यांसाठी काम करण्याची रुची कमी होते आणि काही दिवसानंतर फक्त देशा-बाहेरील कंपन्यांशी बांधीलकी राहते. हा विचार वाईट नसला तरीही येथील नागरिकांसाठी काही करण्याच्या तळमळीतून केतनने फक्त स्वदेशी संस्थांनाच तंत्रज्ञानासंबंधी सेवा देण्याचा निर्णय घेतला. नागपुरातील ‘आयटी’पार्कमध्ये ‘इंडिया ॲक्‍टिव्ह सॉफ्टवेअर’ ही कंपनी यशस्वीपणे सुरू आहे. कंपनीत आठवड्याच्या कामाची सुरुवात राष्ट्रगीताने होते.

केतन मोहितकर नवे व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक संस्थांना तंत्रज्ञानाविषयी कामांचे नियोजन कमी दरात आणि बऱ्याच वेळी मोफत करून देतात. सॉफ्टवेअर क्षेत्रात आपला रोजगार सुरू करण्याचा विचार बाळगणाऱ्या तरुणांना त्यासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा आणि  प्रशिक्षणसुद्धा कंपनीतर्फे दिले जाते. युवकांसोबतच महिलांनाही ते क्षेत्रासाठी प्रोत्साहित करतात. नुकत्याच नोटाबंदीच्या निर्णयानंतर महिलांमध्ये ‘कॅशलेस’ व्यवहारांबद्दल शंका होत्या. त्या दूर करण्यासाठी केतन यांनी शहराच्या विविध भागांत महिला तसेच दुर्बल समाज घटकांसाठी प्रशिक्षण शिबिर घेतले. त्यासाठी त्यांनी समविचारी युवकांची चमू तयार केली. तरुणांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रुची घ्यावी, असे त्यांचे मत आहे. ते याबद्दलही युवकांचे मार्गदर्शन करीत असतात. व्यवस्थेला मोठे करण्यापेक्षा ती मजबूत आणि समाजासाठी उपयोगी बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल केली पाहिजे असा मोलाचा संदेश देण्याचे काम ते आपल्या कृतीतून देतात. 

Web Title: ketan mohitkar sucess story