esakal | किटसाठी लागतात कामगारांच्या पहाटेपासून रांगा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

किटसाठी लागतात कामगारांच्या पहाटेपासून रांगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : कामगार कल्याणकारी मंडळाच्या सुमार नियोजनामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किटसाठी तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांना मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. बांधकाम किट वाटपाबाबत
कुठल्याही प्रकारची वेळ ठरविली नसल्याने कित्येकांना भर रस्त्यावर मुक्काम ठोकण्याचा प्रसंगही ओढवत आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळामार्फत साहित्य वाटप प्रक्रिया सुरू आहे. परंतु योग्य नियोजन न केल्याने कामगारांना तासन्‌तास भर पावसात भल्या पहाटेपासून रांगेत उभे राहावे लागते. चामोर्शी रोडवरील फंक्‍शन हॉल आणि चंद्रपूर रोडवरील नगरपालिका टाऊनसमोर किट वाटपाची प्रक्रिया राबविली जात आहे. पुरुष कामगारांबरोबरच महिला कामगारांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या समस्येकडे जिल्हा प्रशासन आणि कामगार अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने किट वाटपाचा गोंधळ सुरू आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, 1996 व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) नियम, 2007 मधील तरतुदीनुसार शासनाने 1 मे 2011 ला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. याअंतर्गत 21 ऑक्‍टोबर 2013 रोजी बांधकाम कामगारांना भेटवस्तू देण्याचा ठराव केला आहे. त्यानुसार उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार बांधकाम कामगारांना मच्छरदाणी, ब्लॅंकेट, चादर, जेवणाचा डब्बा, चटई या पाच वस्तू खरेदी करण्यासाठी तीन हजार रुपये दिले जात आहेत. शासनाच्या आदेशाप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगारांना गेल्या काही दिवसांपासून बांधकाम किट वाटप कार्यक्रम
सुरू आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या हस्ते किटचे वितरणसुद्धा करण्यात आले. मात्र, किट वाटपाचे नियोजन, कामगारांना
होत असलेला त्रास, याचा विचार केला जात नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
आंदोलनाचा इशारा
स्थानिक पातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साहित्य वाटपासंबंधात योग्य नियोजन न केल्याने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोठा त्रास होत आहे. उपाशीपोटी, आपल्या लहान मुलाबाळांसह महिलांना तासन्‌तास बसावे लागते. यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात येत नाही. एका वाहनामध्ये पेट्या आल्या की, त्या ठिकाणी कामगारांची गर्दी होते. यात महिलांना धक्काबुक्कीचा त्राससुद्धा सहन करावा लागत आहे. कामगारांना होणारा त्रास थांबला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी दिला आहे.

loading image
go to top