esakal | कोळसे-पाटील म्हणतात, ईव्हीएमचा विरोध केल्यानेच ठाकरेंची चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

कोळसे-पाटील

कोळसे-पाटील म्हणतात, ईव्हीएमचा विरोध केल्यानेच ठाकरेंची चौकशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर  : ईव्हीएममध्ये फेरबदल करता येते, हे यंत्र व त्यासाठी आवश्‍यक चिप तयार करणाऱ्या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईव्हीएम तयार करणाऱ्या देशात मतपत्रिकेचा उपयोग होतो. ईव्हीएमविरोधात आवाज उचलणाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यात येते. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची चौकशीही त्यामुळेच झाल्याचा आरोप माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.
ईव्हीएम संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर पुष्टी केली आहे. ईव्हीएमने निवडणूक लढणे फक्त औपचारिकता आहे. सर्व पक्ष, संघटना ईव्हीएम हटवण्याची मागणी करीत असताना सत्ताधारी मात्र ईव्हीएमचा आग्रह धरत आहे. आम्ही ईव्हीएमविरोधात लढत आहोत. या लढ्यात आमच्या सोबत येणाऱ्यांविरुद्ध चौकशी लावण्यात येते. परंतु, पुढील निवडणूक मतपत्रिकाने घेण्याच्या मागणीसाठी काही दिवसांत मुंबई आणि दिल्लीत मोठे आंदोलन करण्यात येईल. कलम 370 काढून टाकण्याचा निर्णय पूर्वनियोजित होता. लोकसभा निवडणूक काश्‍मीरसह देशात घेण्यात आली. मात्र, तेथे विधानसभेची निवडणूक घेण्यात आली नाही. ही लोकशाही होऊ शकत नाही. राज्यसभेत बहुमत नव्हते; परंतु चौकशीचा धाक दाखवून इतर पक्षाचा पाठिंबा मिळवला. हा निर्णय म्हणजे बेकायदेशीर "शॉटकट' असल्याची टीकाही कोळसे-पाटील यांनी केली.
विरोधात बोलणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. वैचारिक अभिव्यक्ती थांबवली आहे. त्यांना शहरी नक्षलवादी किंवा आतंकवादी ठरविण्यात येत आहे. देशात भीतीचे आणि दडपणाचे वातावरण आहे. विचारवंतांनी विचारलेलेल्या प्रश्‍नांना उत्तर न देता त्यांना संपवून टाकण्यात येते आहे. शिवाय सर्वसामान्यांचे शिक्षणदेखील मागच्या दाराने बंद केले आहे. अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शुल्क 400 पट वाढवले आहे. नोटाबंदी करण्यापूर्वी हजारो कोटी रुपये विदेशातून छापून भारतात आणण्यात आल्याचा खुलासा स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आल्याचे कोळसे-पाटील यांनी सांगितले.

loading image
go to top