सोयाबीन कापणीसाठी मजुरांची पळवापळवी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

वेलतूर  (जि.नागपूर) : सोयाबीन कापनीसाठी वेलतूर परिसरात मजुरांची पळवापळवी सुरू आहे. पावसाच्या भीतीने कापणीला आलेले सोयाबीन मळणी करून ते शेतातून सुरक्षित घरी आणण्याकडे आजघडीला शेतकऱ्यांचा कल आहे. त्यासाठी मजूर मागेल ती रक्कम मजुरी म्हणून शेतकरी देत आहेत. सोबत मजुरांची जाण्या-येण्याची वाहनव्यवस्थाही तो लावत आहे. 

वेलतूर  (जि.नागपूर) : सोयाबीन कापनीसाठी वेलतूर परिसरात मजुरांची पळवापळवी सुरू आहे. पावसाच्या भीतीने कापणीला आलेले सोयाबीन मळणी करून ते शेतातून सुरक्षित घरी आणण्याकडे आजघडीला शेतकऱ्यांचा कल आहे. त्यासाठी मजूर मागेल ती रक्कम मजुरी म्हणून शेतकरी देत आहेत. सोबत मजुरांची जाण्या-येण्याची वाहनव्यवस्थाही तो लावत आहे. 
दररोज मजुरांची मजुरी बाढत आहे. यासाठी गरजवंत शेतकरी चढ्या मजुरीची बोली लावून मजूर कापणीसाठी आपल्या शेतात नेत आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे चित्र परिसरात निर्माण झाले आहे. मात्र असे न केल्यास पाऊस हातचे आलेले पीक केव्हा मातीमोल करेल याचा नेम नसल्याची भीती जो तो व्यक्त करत आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन वाढीवर व उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यंदा सरासरी पेक्षाही कमी उत्पादन मिळत असल्याने सोयाबीन उत्पादक हवालदिल झाला आहे. सोबत सततच्या ढगाळ वातावरणामुळे त्याच्या समोर उभे असलेले पिकही वाचविण्याचे मोठे आवाहन आहे. 
दसऱ्यापासून सुरू होणारा सोयाबीन विक्री बाजार प्रतीक्षेत आहे. जुन्या सोयाबीनला चांगला भाव असून नव्या सोयाबीनची खरेदी-विक्री अजूनही निवडणुकीच्या चक्रात अडकली आहे. त्यामुळे शेतकरी बेजार आहे. दिवाळी व नव्या हंगामातील मशागतीसाठी व पेरणी खर्चाचे तालमेल लावताना त्याची चांगलीच दमछाक होत आहे. सरकारच्या हमी भाव घोषणेची ही प्रतीक्षा आहे. 
यावर्षीही उत्पादन खर्चात मोठी वाढ आहे. पावसामुळे उत्पादन घटले आहे व हे सातत्याने घटत आहे. या संदर्भात कृषी विभागाने मार्ग दर्शन करून सोयाबीन उत्पादकाना मदत करावी. 
- पंकज शेंडे, शेतकरी 
नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीन पेरणी करतात. त्यांच्या उत्पादनाचा ताळेबंद नफा स्तरावर जात नसेल तर अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन का करू नये. त्यानी शेताच्या बाधावर येऊन पीकनिरीक्षण करावे. 
- ग्यानिवंत साखरवाडे, माजी सरपंच, वेलतूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The laborers are on the run for the bean harvest