अरे हे काय, पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाला यंदा होणार उशीर 

late monsoon delayed the arrival of migratory birds
late monsoon delayed the arrival of migratory birds

नागपूर  ः जागतिक हवामान बदलांची परिस्थिती आणि मान्सून लांबल्याने यंदा स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन लांबलेले आहे. हिवाळ्यातील थंडीच्या दिवसांत अनेक दूरदेशीचे पाहुणे पक्षी येतात. यावर्षीसुद्धा राज्यात परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले असले तरी त्याची संख्या अतिशय अल्प आहे.

यावर्षी पावसाळा लांबल्याने अद्याप तलावाच्या अथवा धरणाच्या शेजारी किनारे तयार झालेले नाहीत. धरण अथवा तलावांच्या किनाऱ्यावर विदेशी पक्षी वास्तव्यासाठी येतात. अद्यापही नागपूर जिल्ह्यातील अनेक तलावांवरील किनाऱ्यांवर पाणी आहे. तसेच शेतीला अद्यापही पाणी देणे सुरू झालेले नसल्याने किनारे तयार झालेले नाही. 

त्यामुळे उमरेड तालुक्यातील काही तलाव वगळता इतर भागातील जलाशयावर पक्षी आहेत. मात्र, अधिवासाच्या ठिकाणी खाद्यच उपलब्ध नसल्याने त्यांनी पुढील जिल्ह्यात स्थलांतर केले आहे. त्यात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील जलाशयांचा समावेश आहे. त्यामुळे त्या भागात विदेशी पक्ष्यांची संख्या वाढली असून, पक्षी प्रेमींसाठी ही पर्वणी ठरू लागली आहे, असे पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांनी सांगितले.

पक्ष्यांच्या स्थलांतराचे मुख्य कारण म्हणजे त्या भागात ऋतूनुसार निर्माण होणारी अन्नाची कमतरता. थंडीत जलाशय गोठल्यामुळे खाद्यान्नाची अनुपलब्धता, जगण्यासाठी लागणारे संतुलित व सुरक्षित वातावरण, विणीच्या मोसमात घरटी बांधण्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षित जागा व परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात. 

भारतात मध्य, पूर्व, उत्तर व दक्षिण युरोप, रशिया सायबेरिया, मंगोलिया, तिबेट यासह आशिया खंडाच्या अनेक भागांतून राज्यात अनेक पक्षी येतात. पक्षी हे साधारणतः ताशी ५० ते ६० कि.मी. च्या वेगाने उडतात. दिवसा व रात्रीही प्रवास करतात, असे राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी सांगितले.

पर्यावरण स्वच्छ राखण्यात मदत

निसर्ग संतुलनात पक्षी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. विदेशातील हे पाहुणे पक्षी पाण्यातील, हवेतील व वनस्पतीवरील असंख्य कीटक खातात. पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. जागतिक हवामान बदलांची परिस्थिती व वनसंवर्धनात पक्ष्यांचे स्थलांतर महत्त्वाचे आहे. विदर्भात जलाशयावर परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झालेले आहेत. या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये राजहंस, तनई, गजरा, परी, सरग, चिमण शेंद्रया, लहान रेव टिटवा, पानविला मोठा पानलावा छोटा दिलवा, जलरंक, तपकिरी डोक्याचा कुरव या पक्ष्यांचा समावेश आहे. 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com