वंचित आघाडीला जबर धक्का, हे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

वंचित बहुजन आघाडीचा राजीनाम देणारे माजी आमदार हरिदास भदे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात ते असून, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 

अकोला : वंचित बहुजन आघाडीचा राजीनाम देणारे माजी आमदार हरिदास भदे हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात ते असून, कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. 
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार राहिलेले भदे यांच्यासह 48 पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा जिल्हाभर होती. मात्र मंगळवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात वंचितचे ईशान्य मुंबईतील नेते राहुल डोंगरे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर माजी आमदार हरिदास भदे यांच्याशीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी संपर्क साधून त्यांना पक्षात येण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे. यापूर्वी बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार हेसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. दोन्ही माजी आमदारांनी एकाचवेळी राजीनामा दिला असल्यामुळे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

‘वंचित’चा राजीनामा दिल्यानंतर कोणताही राजकीय निर्णय अद्याप घेतला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते संपर्कात आहेत. राष्ट्रवादीकडूनही प्रस्ताव आला आहे. माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पुढील राजकीय भवितव्य निश्‍चित करू. 
- हरिदास भदे, माजी आमदार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this leader on the path of the NCP