मोबाईल, इंटरनेट सोडा...थेट मैदानावर भेटा! 

रविंद्र कुंभारे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

गुमगाव   (जि.नागपूर):  गेल्या तीन वर्षांपासून देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा आमिर खानच्या "दंगल' या सिनेमाची चर्चा जोरात सुरू होती. आपल्या दोन्ही मुलींना कुस्ती शिकविण्यासाठी त्यामध्ये घेतलेले कष्ट, समाजाशी दिलेला लढा प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणतो. तशाच प्रकारचा "दंगल टू'चा प्रयोग सध्या हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव या गावात घडत आहे. चहाटपरी चालवून कुटुंबाचे पालनपोषण करणारे 41 वर्षीय महादेव कुबडे हे बच्चेकंपनींना विविध मैदानी आणि साहसी खेळाचे निःशुल्क प्रशिक्षण देत आहेत.

गुमगाव   (जि.नागपूर):  गेल्या तीन वर्षांपासून देशातच नव्हे तर परदेशातसुद्धा आमिर खानच्या "दंगल' या सिनेमाची चर्चा जोरात सुरू होती. आपल्या दोन्ही मुलींना कुस्ती शिकविण्यासाठी त्यामध्ये घेतलेले कष्ट, समाजाशी दिलेला लढा प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणतो. तशाच प्रकारचा "दंगल टू'चा प्रयोग सध्या हिंगणा तालुक्‍यातील गुमगाव या गावात घडत आहे. चहाटपरी चालवून कुटुंबाचे पालनपोषण करणारे 41 वर्षीय महादेव कुबडे हे बच्चेकंपनींना विविध मैदानी आणि साहसी खेळाचे निःशुल्क प्रशिक्षण देत आहेत. "मोबाईल, इंटरनेट सोडा...मैदानावर येऊन कर्तबगारी दाखवा,' असे आवाहन सध्या महादेव बच्चेकंपनींना आणि युवकांना करताना दिसत आहेत. 
महादेव यांनी विविध गावांतील जत्रा, आखाडे, रथयात्रा, शोभायात्रा आणि पालखी सोहळ्यांमध्ये तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवून नाव कमावले. पण मोबाईलच्या युगात जिथे तरुणवर्ग मैदानापासून दूर जात आहे, अशावेळी हे मैदानी खेळ लोप पावण्याची भीती आहे. त्यामुळे हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी गावातील मैदानामध्ये रोज हा थरार महादेव यांच्याकडून बच्चेकंपनींना शिकायला आणि अनुभवायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुलांबरोबरच मुलीसुद्धा याचे प्रशिक्षण घेत आहेत.  महादेव यांना शालेय जीवनापासूनच दांडपट्टा, तलवारबाजी आणि लाठीकाठीसारख्या मैदानी खेळांची आवड. मोठ्या मेहनतीने त्यांनी हे कौशल्य आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या जिद्दीने आत्मसात केले.  लोकांकडून मिळालेल्या टाळ्या आणि पाठीवर पडलेल्या शाबासकीच्या थापेमुळे पुढे वेगवेगळ्या जत्रा, आखाडे, रथयात्रा, पालखी, शोभायात्रा, गणतंत्रदिन आणि स्वातंत्र्यदिन सोहळ्यामध्ये त्यांच्या नावाचा "डंका' वाजू लागला. 
साहसी खेळाचा थरार 
तलवारबाजी, दांडपट्टा, लाठीकाठी, पट्ट्यायाचे हात, लाठीचे हात, बन्नाट, आगीच्या जळत्या रिंगमधून पाच मुले पलटी मारणे, यासारख्या अनेक मैदानी खेळांचा थरार आज गुमगाववासी अनुभवत आहेत. स्वतःबरोबरच दुसऱ्याचे रक्षण करण्याच्या हेतूने आता मुलीसुद्धा या मैदानी खेळांचा आनंद लुटताना दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leave mobile, internet ... Meet live on the field!