बिबट्या आला रे!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी व कपाशी वेचनीसाठी महिला मजूर काम करत होते. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांची मोठी तारंबळ होत आहे.

पळशी बु. (जि.बुलडाणा) : खामगाव तालुक्यात येत असलेल्या पळशी खुर्द येथे 21 डिसेंबर रोजी रात्री दरम्यान संदीप भिकाजी धनोकार यांच्या गुरांच्या गोठ्यात बांधलेल्या दीड वर्षीय वासरीला बिबट्याने ठार मारल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात शेतकरी व शेतमजूर बिबट्याच्या बाबतीत भयभीत होते. 24 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास पळशी खुर्द व पळशी बु येथील चोपण व काईच्या शिवारात अज्ञात व्यक्तीने ‘आला रे बिबट्या आला रे’ अशा प्रकारे आरडा ओरडा करीत असल्याचा आवाज ऐकू आला असता शेतात काम करत असलेले मजूर भीतीने घराकडे परतले.

पळशी खुर्दकडून येत होता आवाज
काईच्या शिवारात नारायण पांडुरंग धनोकार व नारायण शालिग्राम चव्हाण यांचेसह अनेक शेतकऱ्यांच्या शेतात गव्हाला पाणी देण्यासाठी व कपाशी वेचनीसाठी महिला मजूर काम करत होते. मात्र, बिबट्या आला रेच्या आरडा ओरड्याने परिसरातील मजूर भयभीत होवून घराकडे परतले. यावेळी त्या मजुरांना याबाबत विचारणा केली असता कुणी तरी पळशी खुर्द कडून, बिबट्या आला रे-वाघ आला रे असे जोर जोरात ओरडत होते. 

हेही वाचा - हिऱ्यांचा हार घेऊन चोर घुसले अकोल्यात

म्हणून आम्ही सुटलो गावाकडे पळत
आधीच मनात वाघाची भीती निर्माण होती अशातच बिबट्या आला रेचा आवाज आल्यामुळे आम्ही घाबरलो व कापूस वाचणे सोडून धावत पळत गावाकडे जावयास सुटलो असल्याची माहिती पळशी बु येथील संगीता संजय धनोकार यांनी दिली. या बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांची मोठी तारंबळ होत आहे. आवाज करणारा कोण होता हे कळू न शकल्याने कोणी मस्करी तर केली नसावी असा संशय व्यक्त होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard coming in palshi akola marathi news