esakal | पोलिसांनी फिल्मी स्टाईल केली बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

bibat.

बिबटाची शिकार केल्यानंतर त्याची कातडी व अवयव विकण्यासाठी ग्राहकांच्या शोधात असलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने गजाआड केले.

पोलिसांनी फिल्मी स्टाईल केली बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्यांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भंडारा : साकोलीत पोहोचलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेषांतर करवून कातडी खरेदी करणारे ग्राहक बनविण्यात आले. कातडी विक्रेत्यांनीसुद्धा चाणाक्षपणे हुलकावणी देत पोलिसांची नजर चुकविण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून पूर्ण खात्री केली.

दरम्यान वेषांतर केलेल्या पोलिसांनीसुद्धा आपण खरे ग्राहक आहोत हे भासविण्यासाठी कोणतीच कसर ठेवली नाही. ग्राहक बनून गेलेल्या पोलिसांना साकोलीजवळील बोदरा ते पिंडकेपार रस्त्यावर बोलविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक नारायण तुरकुंडे आणि दोन कर्मचारी सौदा करण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी पोहोचले. दरम्यान रात्री हिंस्र प्राण्यांचा धोका असतानासुद्धा इतर सहकारी हालचालीवर लक्ष ठेवून दबा धरून बसले. बिबट्याची कातडी घेऊन पोहोचलेल्या आरोपींशी सौद्याबाबत बोलणी सुरू होती. इशारा मिळताच लपलेल्या पोलिसांनी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीवरुन बिबट्याच्या तोंडाचा खालचा व वरचा जबडा खैरी पिंडकेपार येथे जाऊन दोघांना पकडून जप्त केला.

बिबटाची शिकार केल्यानंतर त्याची कातडी व अवयव विकण्यासाठी ग्राहकांच्या शोधात असलेल्या सहा जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून मोठ्या शिताफिने गजाआड केले. दुर्योधन गहाणे (वय 32), रा. आमगाव बूज., पंकज दिघोरे (वय 25) रा. सुभाष वॉर्ड कोंढा, लक्ष्मीकांत शेषमंगल नान्हे (वय 29), रा. रुक्‍मीणी नगर, भंडारा , योगेश्‍वर गहाणे (वय 41) रा. सिरेगाव, रंजीत रामटेके (वय 26), चंद्रशेखर रामटेके (वय 40), रा. खैरी पिंडकेपार अशी आरोपींची नावे आहेत.

बिबटाची कातडी विकण्यासाठी काही जण ग्राहकांच्या शोधात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन कंकाळे यांना मिळाली होती. त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना याबाबत अवगत केले. त्यांच्या निर्देशानुसार पथक कामाला लागले.
या कारवाईत पोउपनि उईके, पोहवा सुधीर मडामे, नितीन महाजन, मोहरकर, धर्मेद्र बोरकर पोलिस नायक रोशन गजभिये, गौतम राऊत, नंदू मारबते, तायडे, डहारे, पोलिस शिपाई स्नेहल गजभिये, चेतन पोटे, कौशिक गजभिये, मंगेश माळोदे, बंटी मडावी, खराबे यांनी सहभाग घेतला.

दोन आरोपी उच्चशिक्षित
या सहा आरोपीपैकी दोन जण हे उच्चशिक्षित आहेत. परंतु, पैशाच्या मोहापायी ते या प्रकरणात अडकले. आरोपींच्या ताब्यातून बिबटाची कातडी(अंदाजे किंमत 25 लाख रुपये), 3 मोटारसायकल, 4 मोबाईल हॅंडसेट, 2 स्पोर्टस बॅग व बिबट्याच्या तोंडाचा खालचा व वरचा जबडा(अंदाजे किंमत 1 लाख) असा एकूण 27,11,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मुद्देमालासह या सहाही जणांना पुढील कारवाईसाठी वनविभागाकडे सोपविण्यात आले.

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे यांनी या वादाविषयी केला मोठा खुलासा...

3 कोटीत ठरला होता सौदा
बिबट्याच्या कातडीची किंमत विक्री करणाऱ्यांनी ग्राहक बनून गेलेल्या पोलिसांना पाच कोटी रुपये सांगितली होती. पोलिसांनी त्यांना यापुढे नेहमी तुमच्याकडूनच प्राण्यांची कातडी व अवयवांची खरेदी करू असे आमिष दाखवून सौदा 3 कोटी रुपयांमध्ये पक्‍का केला होता. उसाच्या शेतीला असलेल्या तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडण्यात आला. यात बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर कातडी व अवयवांची विक्री करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. अशी माहिती चौकशीदरम्यान आरोपींनी पोलिसांनी दिली.