मोबाईल ऍपद्वारे शिक्षणाचे धडे

बालकदास मोटघरे : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी हाच उद्देश आहे.

- किशोर चौधरी अध्यक्ष, विचार विकास सामाजिक संस्था, वरोरा

आनंदवन (चंद्रपूर) - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी, शिक्षणाचे व स्वच्छतेचे महत्त्व कळावे, अक्षर आणि रंग ओळख व्हावी यासाठी आता मोबाईल ऍपचा वापर केला जाणार आहे. तालुक्‍यातील 57 शाळांतील सहा ते आठ वयोगटातील सुमारे 700 विद्यार्थ्यांना मोबाईल ऍपद्वारे शिक्षणाचे धडे दिले जाणार आहे. 

प्ले कनेक्‍ट कंपनीने तयार केलेल्या मोबाईल ऍपचे विकास संस्थेद्वारे विनामूल्य शेअर करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विचार विकास संस्थेद्वारे तालुक्‍यातील 57 गावांत सर्वे करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या सहा ते आठ वयोगटातील 700 विद्यार्थ्यांच्या पालकांकडे ऍनराईड मोबाईल असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यानंतर 700 विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 35 गावांतील 271 विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आयडी तयार करून ऍप शेअर करण्यात आले आहे. 

या मोबाईल ऍपद्वारे शब्द एक-अक्षर अनेक, रंगाची ओळख, शाळेचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व, खेळाचे महत्त्व, शिक्षणाची आवड व दर्जा सुधारावा यासाठी वेगवेगळे प्रकार सांगण्यात आले आहेत. मोबाईलमध्ये ऍप सुरू करताच संभाषणाद्वारे याबाबतची माहिती दिली जाते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोबाईलमधील ऍप प्ले करून त्याचे अनुकरण करीत आहेत. यामुळे गुणवत्तावाढीसोबतच व शिक्षणाची आवड निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे पालकांमध्ये बोलले जात आहे.

 

Web Title: Lessons via mobile app