कोरोनाने हिरावला ताडफळ विक्रेत्यांचा रोजगार..वर्षभराच्या बजेटवर विरजण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 June 2020

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे ताडफळांची विक्री मंदावली असून विक्रेते अडचणीत आले आहेत. एक विक्रेता दरवर्षी उन्हाळ्यात ताड विकून किमान दहा हजार रुपये कमवतो. मात्र या वर्षी कोरोनामुळे त्यांना ग्राहक मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

सिरोंचा (जि. गडचिरोली) : दरवर्षी ऊन तापू लागले की बाजारात ताडफळे विक्रीसाठी दिसू लागतात. उन्हाळ्यात या फळांच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करतात. पण यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ताडफळांची विक्री मंदावल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यातील बाराही तालुक्‍यांत आदिवासी समाजबांधव असून संपूर्ण जिल्हा वनाने व्यापला आहे. या वनात चारोळी, टेंभूर, येरुणी, कवट व इतर अनेक प्रकारचा रानमेवा मिळतो. अनेक आदिवासी बांधव हा रानमेवा अहेरी, सिरोंचा, गडचिरोली तसेच तेलंगणा राज्यातील चेन्नूर, मंचेरीयल येथे नेऊन विक्री करीत असतात. यामधून त्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्‍न मिटतो तसेच त्यांना आर्थिक फायदाही होतो.

वर्भभराच्या बजेटला कात्री

उन्हाळ्याचा दिवसांत प्रामुख्याने सिरोंचा तालुक्‍यातील वेनलाया, रोमपल्ली, सिरकोंडा, बेज्जूरपल्ली, झिंगानूर आदी गावांतील नागरिक ताडाची फळे विकत होते. ताडाचे फळ उन्हाळ्यात थंड असल्याने त्याला मोठी मागणी असते. उन्हाळ्यात ताड विकून आदिवासीबांधव आपल्या वर्षभराच्या आर्थिक बजेटला हातभार लावत असतात. एक विक्रेता दरवर्षी उन्हाळ्यात ताड विकून किमान दहा हजार रुपये कमवतो. मात्र या वर्षी कोरोनामुळे त्यांना ग्राहक मिळत नसल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

विक्रेते अडचणीत

यावर्षी आलेल्या महाभयंकर कोरोना महामारीमुळे देशासह राज्यात लॉकडाउन केल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. दळणवळण व्यवस्था बंद असल्याने अनेकांना रानमेवा व ताडविक्री करता आली नाही. त्यामुळे ताडफळांचे विक्रेते अडचणीत आले आहेत.

हेही वाचा : बैल बाजार भरलाच नाही, शेतकऱ्यांची यंदा गोऱ्ह्यांवरच चिखलणीसाठी मदार

सरकार आर्थिक मदत करेल काय?

रानमेवा आणि ताडविक्रीतून येणारे उत्पन्न बंद झाले आहे. त्यामुळे यातून मिळणाऱ्या उत्पन्नापासून विक्रेते वंचित असून त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सरकारने ताड व इतर रानमेवा विक्री करणाऱ्या गरीब व आदिवासी बांधवांना जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप तसेच आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown slows down palm fruit sales in Gadchiroli