तस्करीसाठी "लोकवाहिनी'कडे वक्रदृष्टी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघांत दारू, गांजा, पैशांची होणारी तस्करी लक्षात घेता वाहनांची तपासणी केली जात आहे. लोकवाहिनीमधून गांजा, दारू जप्त करण्यात आल्याने तस्करांची "लोकवाहिनी'कडे वक्रदृष्टी वळल्याचे स्पष्ट होत आहे.

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही मतदारसंघांत दारू, गांजा, पैशांची होणारी तस्करी लक्षात घेता वाहनांची तपासणी केली जात आहे. लोकवाहिनीमधून गांजा, दारू जप्त करण्यात आल्याने तस्करांची "लोकवाहिनी'कडे वक्रदृष्टी वळल्याचे स्पष्ट होत आहे.

आदिलाबाद येथून नागपूरकडे जाणाऱ्या बसमधून तीन लाख रुपये किमतीचा 30 किलो गांजा जप्त करून पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पांढरकवडा तालुक्‍यातील पिंपळखुटी येथील तपासणी नाक्‍यावर काल शनिवारी (ता.पाच) करण्यात आली. तर, वणी येथील वरोरा टी पॉइंटवर बसच्या तपासणीदरम्यान देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. एकाच दिवशी तीन बसमधून होणारी दारू वाहतूक ही धक्कादायक बाब मानली जात आहे. आंध्रा, तेलंगणामधून चोरट्या मार्गाने नेहमीच गांजा तस्करी केली जात असल्याचे सांगितले जाते. निवडणूक कालावधीत पिंपळखुटी येथील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्‍याजवळ स्थिर सर्वेक्षण पथक स्थापन केले आहे. त्यामुळे आलिशान वाहनांची तपासणी केली जाते. या वाहनांतून गांजा, दारू, पैशांची तस्करी केल्यास पकडल्या जाण्याची भीती तस्करांना आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्य परिवहन महामंडळाच्या बसकडे आपला मोर्चा वळविला आहे. स्थिर सर्वेक्षण पथकाकडून बहुतांश वेळा बसची तपासणी केली जात नाही. असा समज असल्याने सुरक्षित तस्करीसाठी लोकवाहिनीचा पर्याय निवडला. मात्र, पिंपळखुटी व वणी येथे एकाच दिवशी चार बसमधून गांजा, देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक बसची तपासणी करणे आवश्‍यक झाले आहे.

पैसा पोहोचविण्यात अडचण
निवडणूक म्हटले की, पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. काही उमेदवारांनी आचारसंहितेपूर्वीच मतदारसंघांत सुरक्षित ठिकाणी पैसा ठेवला आहे. मात्र, काहींना नेत्यांनी रसद पुरविण्याचा शब्द दिला आहे. वाहनांची तपासणी करून रोकड जप्त केली जात आहे. त्यामुळे उमेदवारांपर्यंत पैसा पोहोचविण्यात अडचणी येत असल्याची चर्चा सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A look at the "People's Train" for smuggling