राइसमिल मालकांकडून का होतेय शेतकऱ्यांची लूट...काय आहे कारण

विश्‍वपाल हजारे
Thursday, 30 July 2020

शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विहित मुदतीत मोजणी होणे शक्‍य नाही. त्यामुळे काही केंद्रांत विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या मालाची थेट उचल केली जाते. धानाची खरेदी करताना धानात ओलावा असल्याचे सांगून प्रतिक्विंटल सहा ते सात किलो अधिकचे धान मोजले जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे.

लाखांदूर (जि. भंडारा) : उन्हाळी धानाची आधारभूत खरेदी केंद्रांत विक्रीची मुदत दोन दिवसांत संपत आहे. दरम्यान, केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांना सरळ उचल आदेश देऊन खरेदी सुरू ठेवली आहे. मात्र, राइसमिल मालक धान खरेदी करताना ओलाव्याच्या नावावर प्रतिक्विंटल सहा ते सात किलो धान अधिक घेऊन शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. याकडे केंद्राच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

यंदा उन्हाळी हंगामात लाखांदूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले. खरिपातील खरेदीमुळे तालुक्‍यातील बहुतेक गोदाम भरले आहेत. आता उन्हाळी धानाच्या खरेदीसाठी आधारभूत केंद्र उशिरा सुरू करण्यात आले.

खरेदी केंद्रात गोंधळात गोंधळ

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र, याचवेळी गोदामातील मालाची उचल करण्याचे आदेश राइस मिलर्सला दिले आहेत. आता केंद्रात खरेदी व धानाची उचल अशी दोन्ही कामे एकाचवेळी सुरू आहेत. त्यामुळे खरेदी केंद्रात गोंधळ निर्माण होण्याची परिस्थिती आहे.

प्रतिक्विंटल सहा ते सात किलो धान

शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाची विहित मुदतीत मोजणी होणे शक्‍य नाही. त्यामुळे काही केंद्रांत विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांच्या मालाची थेट उचल केली जाते. यात धर्मकाट्यावर मोजमाप करून राइसमिलमध्ये धान पाठविले जाते. त्यानुसार धानाची खरेदी करताना धानात ओलावा असल्याचे सांगून प्रतिक्विंटल सहा ते सात किलो अधिकचे धान मोजले जाते, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. या गैरप्रकाराला शेतकऱ्यांनी विरोध केल्यास त्याला केंद्रातून धान परत घेऊन जाण्याची धमकी दिली जाते.

जाणून घ्या : तंबाखू खाणाऱ्यांचे आता होणार हाल..कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विक्रेत्यांनी कसली कंबर.. वाचा सविस्तर

महिना लोटूनही ओलावा कायम

उन्हाळी हंगामातील धान कापणी व मळणी पूर्ण होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यामुळे आताही धानाचा ओलावा कापणे योग्य नाही. हे शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठी अधिक धान घेण्याचे षड्‌यंत्र आहे, असा आरोप होत आहे. दरम्यान, केवळ दोन दिवसांची मुदत असताना केंद्र चालकांकडून दिल्या जाणाऱ्या धान उचल आदेशानुसार राइसमिल मालकाकडून अधिकचे धान घेतले जात असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Looting of farmers due to grain lifting order