लग्न झाले नाही; पैसे मात्र बुडाले...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे शासनाच्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे आरक्षित करतेवेळी दिलेले पैसे परत करण्यासाठी सभागृह मालकांकडे तगादा सुरू आहे. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

गडचिरोली : मार्च, एप्रिल व मे महिना म्हटलं की, लग्नसराईची धूम असते. यामुळे मंगल कार्यालय चार ते पाच महिन्यांआधीच बुक करावे लागते. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेकांनी लग्न समारंभासाठी सभागृह मालकांकडे ऍडव्हान्स रक्कम भरून आपल्या कार्यक्रमाची तारीख आरक्षित केली. मात्र, कोरोनामुळे मागील दोन महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी असल्याने बहुतांश लग्नसोहळे रद्द झाल्याने आता सभागृहासाठी दिलेले पैसे परतीचा तगादा सुरू आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात लहान मोठे एकूण 62 सभागृहे तसेच मंगल कार्यालये आहेत. दरवर्षी येथे जवळपास 300 ते 350 विवाह सोहळ्यांसह अन्य सामूहिक कार्यक्रम घेतले जातात. यंदाही विविध समारंभांसाठी नागरिकांकडून सभागृह आरक्षित करण्यासाठी पाच हजारांपासून ते 15 हजार एवढी रक्कम बुकिंग स्वरूपात जमा केली. ऍडव्हान्स स्वरूपातील रक्कम 25 ते 30 लाखांच्या घरात आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसात लग्न सोहळ्याच्या भरगच्च कार्यक्रमांमुळे अनेकदा नियोजित तारखाही मिळत नाहीत. यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे शासनाच्या निर्देशानुसार सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्यामुळे आरक्षित करतेवेळी दिलेले पैसे परत करण्यासाठी सभागृह मालकांकडे तगादा सुरू आहे. मात्र, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्याचा आधार घेतला; परंतु तेथेही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पैसे कसे परत मिळवावे, असा प्रश्‍न अनेक नागरिकांना सतावत आहे. 

हेही वाचा : कशा ठरणार 'आशा' ग्रामीण भागाचा कणा?, वाचा काय झाला गैरप्रकार

लग्न किंवा अन्य कार्यक्रम सभागृहात ठरलेल्या तारखांना न झाल्यामुळे सभागृहातील वीज, पाणी किंवा इतर कोणत्याही वस्तूचा उपयोग झाला नाही. त्यामुळे सभागृहाच्या मालकांचे कोणतेही आर्थिक नुकसान झाले नाही. त्यामुळे सदर रक्कम परत मिळावी, अशी संबंधितांची मागणी आहे. 

 

लॉकडाउनमुळे मागील दोन महिन्यांत आमचा व्यवसाय चौपट झाला आहे. लग्नसोहळे ऊन्हाळ्यातील तीन महिनेच चालतात. त्यामुळे कोरोनाच्या संकटाचा मोठा परिणाम झाला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत आम्ही अनेकांना रोजगार देत आहोत. ग्राहकांनी दिलेली ऍडव्हान्स रक्कम परत न करण्याची अट सभागृह बुकिंग करतानाच घातली जाते. 
-सुनील पोरेड्डीवार, अध्यक्ष, मंगल कार्यालय संघटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of money paid in advance