विवाहितेचा गर्भपात करून अर्भक जंगलात पुरले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

love crime news married woman aborted and buried infant in forest

विवाहितेचा गर्भपात करून अर्भक जंगलात पुरले

लाखांदूर : प्रेमसंबंधातून गर्भवती ठरलेली विवाहिता लग्न होऊन सासरी आली. मात्र, सासरच्या मंडळीने तिचा गर्भपात करून अर्भक जंगलात पुरल्याची घटना चिचाळ येथे घडली. पीडितेच्या तक्रारीवरून पती, सासू-सासरे यांच्यासह अन्य ७ जणांवर दिघोरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. निखिल विलास रंगारी (वय २७), विलास शंकर रंगारी (वय ५५), देवला विलास रंगारी (वय ४८), लीना रंगारी (वय ३४), अक्षय खोब्रागडे (वय २२), मोहित शेंडे (वय २५), लक्ष्मण जांगळे (वय ३८), अंगित रंगारी (३२) सर्व रा. चिचाळ व साकोली येथील दोन अनोळखी महिला, पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.

पीडितेचे एक वर्षापासून गावातील निखिल रंगारी याच्याशी प्रेमसंबंध होते. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. त्यानंतर दोघांनी ६ ऑगस्टला आंतरजातीय विवाह केला होता. विवाह होऊन पीडिता पतीच्या घरी राहावयास गेली असता, तिच्या सासरच्यांना अन्य आरोपींनी चिथावणी दिल्याने त्यांनी तिच्या गर्भधारणेवर संशय व्यक्त करून छळ केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, सासरच्या लोकांनी २ व ३ सप्टेंबरला पीडितेला गर्भपाताचे औषध दिले. त्यामुळे तिला अस्वस्थ वाटत असताना उपचाराच्या बहाण्याने साकोली येथे नेले, अनोळखी महिला व पुरुष आणि इतर आरोपींच्या साहाय्याने गर्भपात करून अर्भक जंगलात पुरल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याबाबत पीडितने दिघोरी मोठी पोलिसांत १५ सप्टेंबरला तक्रार दाखल केली. पोलिसांनी पती, सासू-सासऱ्यासह अन्य ७ जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तपास साहायक पोलिस निरीक्षक हेमंत पवार करीत आहेत.