लॉकडाउनमध्ये "शाकाल' लुकला पसंती...डोक्‍याचा केला चमनगोटा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 May 2020

नुकत्याच वाढलेल्या लॉकडाउनमध्ये हेअर सलून अर्थात केशकर्तनालये पुन्हा बंद करण्यात आली आहेत. ही बाब कदाचित अनेक सुपीक डोक्‍याच्या लोकांनी हेरली असावी. म्हणून त्यांनी ही केशकर्तनालये बंद होण्यापूर्वीच आपल्या सुपीक डोक्‍याचा चमनगोटा अर्थात टक्‍कल करून घेतले. त्यातूनच कित्येकांनी या "शाकाल' लूकला पसंती दिली आहे.

गडचिरोली : फार वर्षांपूर्वी येऊन गेलेला शान हा चित्रपट तेव्हा तिकीटबारीवर फार चालला नसला; तरी यातील कुलभूषण खरबंदा यांनी साकारलेला "शाकाल' हा संपूर्ण टक्‍कल असलेला खलनायक मात्र, प्रचंड लोकप्रिय झाला. त्यामुळे कुणी टक्‍कल केले की, त्याला "शाकाल' म्हणायची प्रथाच पडली होती. आता कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हा "शाकाल' लुक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सध्या सर्वत्र कोरोना संसर्गाची भीती असल्याने देशभरात लॉकडाउन आहे. त्यात थोडी शिथिलता आणत सरकारने काही निर्बंधांसह निवडक व्यवसायांना परवानगी दिली आहे. पण, नुकत्याच वाढलेल्या लॉकडाउनमध्ये हेअर सलून अर्थात केशकर्तनालये पुन्हा बंद करण्यात आली आहेत. ही बाब कदाचित अनेक सुपीक डोक्‍याच्या लोकांनी हेरली असावी. म्हणून त्यांनी ही केशकर्तनालये बंद होण्यापूर्वीच आपल्या सुपीक डोक्‍याचा चमनगोटा अर्थात टक्‍कल करून घेतले.

डोक्‍यावरचा बार केला हलका

यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर टक्‍कल करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. एरवी उन्हाळ्यात घामोळ्या, कोंडा किंवा इतर केसांचे विकार, त्वचाविकार होऊ नये म्हणून लहान मुलांचे टक्‍कल करतात. क्वचित काही व्यक्ती उन्हाळ्यात डोक्‍यावरचा केसांचा भार हलका करून शांतीचा अनुभव घेतात. पण, मार्चमध्ये लॉकडाउन झाल्यानंतर अनेकांना केस कापण्याची आठवण आली. हे लॉकडाउन असेच सुरू राहिले, तर दाढी घरीच करता येईल, पण केस कसे कापायचे हा प्रश्‍न अनेकांना भेडसावत होता. त्यातूनच कित्येकांनी या "शाकाल' लूकला पसंती दिली आहे.

समाजमाध्यमांवर टक्कल पोस्ट

अनेकांनी तर टक्‍कल केल्याकेल्याच आपले तुळतुळीत टक्‍कल केलेले फोटो फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम आदी समाजमाध्यमांवर पोस्ट केले. त्यांना अर्थातच शाकाल, टकलू हैवान, मोगॅम्बो, अशा टोपणनावांच्या शुभेच्छा मिळाल्या. अनेक ठिकाणी बालकांसोबत पालकांनीही आपला चमनगोटा उरकून घेतल्याचे दिसून आले. कधी कशाची फॅशन येईल सांगता येत नाही. अनेकदा फॅशन परतूनही येते. तशीच "शाकाल' लूकची फॅशन परतून आल्याचे दिसत आहे.

असं घडलंच कसं : जंगलात जाऊन तेंदूपाने केले गोळा अन् कुटुंबाच्या मदतीने तयार केले मुडके; मात्र, केंद्रावर घडला हा प्रकार...

घरीच कापतात केस

सध्या सलून बंद असल्याने अनेकांना केस कापता येत नाही. दाढी कशीतरी करता येईल पण, केस कापणे ही अवघड व कौशल्याची बाब आहे. मात्र, अनेक नागरिकांनी कोरोनामुळे सलून लवकर उघडणार नाही, हे लक्षात घेत घरीच केस कापणे सुरू केले आहे. त्यासाठी घरातल्या सदस्यांचीही मदत घेतली जात आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loved the "Shakal" look in the lockdown