"त्या' प्रेमीयुगुलाची पुन्हा घरवापसी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जानेवारी 2020

तालुक्‍यातील डुगीपार पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या डववा गावातील 20 वर्षीय युवती आणि पवन गिरी (वय 22) हे दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी कोणालाही न सांगता घरून निघून गेले.

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील डववा गावातील प्रेमीयुगुलांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र, दोघांच्याही पालकांना ते मान्य नव्हते. त्यांनी पोलिसात तक्रार केली. त्यामुळे पोलिसांनी आपली तपास यंत्रणा कामाला लावली. पुण्याजवळील रांजणगाव येथून दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. 

ते बदलवित होते राहण्याचे ठिकाण

तालुक्‍यातील डुगीपार पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या डववा गावातील 20 वर्षीय युवती आणि पवन गिरी (वय 22) हे दि. 5 नोव्हेंबर 2019 रोजी कोणालाही न सांगता घरून निघून गेले, अशी तक्रार दोघांच्याही पालकांनी पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तपास केला असता दोघेही त्यांचे राहण्याचे ठिकाण बदलत असल्याचे कळून आले. 

अवश्‍य वाचा- वडिलांच्या प्रेमाला मुकल्याने तीने केले असे... 

रांजणगावमध्ये मिळाले मोबाईल लोकेशन 

त्यांच्या मोबाईल लोकेशनवरून ते सध्या पुणे शहराजवळील रांजणगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून वरिष्ठांच्या आदेशावरून डुगीपार पोलिस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी व एका महिला कर्मचाऱ्याला तातडीने रांजणगाव येथे पाठविण्यात आले. तेथे सापळा रचून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता दोघांनीही लग्न केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी दोघांच्याही पालकांशी संवाद साधून त्यांना रांजणगाववरून प्रथम डुगीपार पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांच्याही पालकांना बोलावून विवाहित प्रेमीयुगलाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या नेतृत्वात पोलीस नाईक दहिवले, पोलीस नाईक मराठे व महिला पोलीस शिपाई कमानी यांनी पार पाडली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "That 'lover's homecoming again