esakal | Video : पांढ-या सोन्याची होतेय बेभाव विक्री, शेतकरी आर्थिक संकटात!
sakal

बोलून बातमी शोधा

cotton.

शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावाने खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेचणीचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलबंडीतून  उतरवलेला कापूस परत घरी नेला. मात्र किती दिवस कापूस घरी ठेवणार आणि पैशाची काय सोय करणार या विवंचनेत शेतकरी  मिळेल त्या किमतीत कापूस विकत असून शेतकरी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत आहे.

Video : पांढ-या सोन्याची होतेय बेभाव विक्री, शेतकरी आर्थिक संकटात!

sakal_logo
By
श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) :अस्मानी सुलतानी संकटांनी आधीच चारही बाजूने चित झालेल्या शेतकऱ्यांची पिळवणूक करून त्याचे आर्थिक शोषण करण्याचा प्रकार सर्रास सुरु आहे. यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तर शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे.
सी सी आय चे कापूस खरेदी केंद्र योग्य दराने शेतकऱ्याच्या कापसाची खरेदी करीत होते, मात्र त्यानंतर एक महिन्यापासून लाँकडाऊन असल्यामुळे कापूस खरेदी बंद होती. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांचा कापूस घरीच पडून राहिला. आज नाही तर उद्या सी सी आय ची खरेदी सुरु होईल या आशेने शेतक-यांनी एक महिना वाट पाहिली परंतु शेतीचा हंगाम एक महिन्यावर आल्याने बी-बियाणांची जुळवाजुळव करणे व बँकेचे कर्ज भरायचे असल्यामुळे शेतकरी खाजगी कापूस विक्री केंद्राकडे वळले. मात्र शेतकऱ्यांच्या  विवशतेचा फायदा घेत राजुरा गडचांदूर मार्गावरील आशीर्वाद कोटेक्स कापूस जिनिंग केंद्रावर शेतकऱ्यांचा कापूस कवडीमोल भावाने खरेदी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेचणीचाही खर्च निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बैलबंडीतून  उतरवलेला कापूस परत घरी नेला. मात्र किती दिवस कापूस घरी ठेवणार आणि पैशाची काय सोय करणार या विवंचनेत शेतकरी  मिळेल त्या किमतीत कापूस विकत असून शेतकरी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करीत आहे.


 सदर जिनिंगला पणन संचालक कार्यालयाकडून परवाना मिळाला असल्यामुळे त्यांच्यावर बाजार समितीचे नियंत्रण नसल्याने त्या ठिकाणी त्यांचाच मापारी व दर ठरविणारा व्यक्ती असल्याने त्यांचा मनमानी कारभार सुरू असून हलका कापूस प्रति क्विंटल दोन हजार रुपये तर चांगला कापूस तीन हजार रुपये पर्यंत खरेदी करीत असून यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण होत आहे. आधी बैलबंडीतील कापूस घेण्यास नकार देण्यात येऊन शेतकऱ्यांच्या गोंधळानंतर उशिराने बैलबंडीमधील कापूस खरेदी सुरू केली.
कापूस खरेदी करताना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नसल्याने शेतकऱ्यांकडे कापसाच्या वजनाचा व दराचा कसलाही पुरावा नाही. एखाद्या शेतक-याला पैसे न मिळाल्यास तक्रार करण्यासाठी पावती गरजेची असताना  जिनिंग मालक पावती देत नसल्यामुळे व यांच्यावर बाजार समिती प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण झाला असून अशा जिनिंग मालकांचा परवाना रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रतिक्विंटल पंचविसशे रुपये उत्पादन खर्च असताना दर मात्र फक्त दोन हजार रुपये मिळतो.
जिल्हा उपनिबंधकाचा जिनिंग मालकाला आशीर्वाद तर नाही ना? असा शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आहे.

सविस्तर वाचा - झुरळ मारून अंगणात का फेकले; यावरून शेजा-याने घडविले महाभारत

शेतक-यांनी तक्रार करावी
 शेतकऱ्यांनी चांगला कापूस असल्याचा पुरावा द्यावा, सी सी आय ची खरेदी सुरू होणार असून शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कापूस विक्रीसाठी आणावा, शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर पाहू                                                                               ज्ञानेश्वर खाडे                                                                                  जिल्हा उपनिबंधक चंद्रपूर

जिनिंगची मान्यता रद्द करा
दोन दिवसांपासून  बैलबंडी भरून कापूस जिनिंगवर  विक्रीसाठी आणत आहो, परंतु कापसाची खरेदी कवडीमोल भावाने होत असून कोणत्याही प्रकारची पावती देत नाही तेव्हा प्रशासनाने अशा जिनिंगची मान्यता रद्द करायला पाहिजे.  
राहुल खेडेकर                                                                                शेतकरी आर्वी

loading image