लुचई, लुडका ताटातून हरवतोय !

 वेलतूर ः परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले विदर्भातील धानाचे पीक.
वेलतूर ः परतीच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झालेले विदर्भातील धानाचे पीक.

वेलतूर (जि.नागपूर)  धान उत्पादक शेतकरीवर्ग हवालदिल झाला असून धानाचे अनेक वाण संकटग्रस्त स्थितीत आहेत. दरवर्षाला बियाणे कंपन्यांचे नवनवीन वाण बाजारात येत असल्याने पारंपरिक वाण अखेरच्या घटका मोजत आहेत. लुचई व लुडका हे वाण नामशेष होत आहेत. मात्र, काही बोटावर मोजण्याइतके शेतकरी त्यांच्या संवर्धनासाठी झटत आहेत. सेंद्रिय शेतीप्रयोगाने याला आता चळवळीचे स्वरूप आले आहे, हे विशेष. 

संकरित धानामध्ये एच.एम.टी.सोनालिका, जयश्रीराम, सोनम, मयूरी, पिटू, चिंटू, बाटली, ओम. करिश्‍मा, 1008, वायएसआर, पवनपुत्र, केसर वाणांची अधिक उत्पादक वाण म्हणून मोठी लागवड करण्यात आली. मात्र, ती लागवड परतीच्या पावसाने पार चिखलात मिळाल्याचे परिसरात चित्र आहे. 
धानापासून तांदूळ मिळतात. त्यांचा गंध, आकार व चवीनुसार त्याला मागणी असते. बारीक व खाण्यासाठी नरम असलेल्या तांदळास सध्या अधिक मागणी आहे. या मागणीत स्थानिक लुचई, लुडका हे वाण बांधातून हद्दपार झाले आहेत. मात्र, त्याच्या आठवणी अनेक खवय्ये आता काढत असतात. 

आपल्या देशातील सुमारे 65 टक्‍के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बऱ्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होतो. तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशुपक्ष्यांचे खाद्य व औद्योगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते. याशिवाय हलक्‍या, भारी, पाणथळ, खारवट अशा विविध प्रकारच्या जमिनीत यशस्वीपणे वाढणारे व उत्पन्न देणारे भात हे प्रमुख तृणधान्य पीक आहे. महाराष्ट्र राज्यातील लागवड करण्यात येणाऱ्या अन्नधान्य पिकांचा विचार करता ज्वारी-बाजरीनंतर भात पिकाचा क्रमांक लागतो. असे जरी असले तरी कोकण, विदर्भाचा नागपूर विभाग तसेच कोल्हापूर, पुणे, नाशिक, विभागाच्या सह्याद्रीलगतच्या भागातील लोकांचे भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. 
 
राज्याची उत्पादकता कमी 
राज्यातील शेतकरी भातशेती अनेक वर्षांपासून करीत आहेत. तरीसुद्धा देशाच्या सरासरी उत्पादकतेशी तुलना करता राज्याची उत्पादकता अत्यंत कमी आहे. त्यामुळे धान उत्पादकाला अनेक समस्यांना समोर जावे लागते. पण, त्याचे निराकरण होत नाही. सुधारित व अधिक उत्पादन देणाऱ्या भात जातींच्या लागवडीखाली असलेले कमी क्षेत्र, सेंद्रिय व रासायनिक खतांचा शिफारशीपेक्षा कमी आणि असंतुलित वापर, कीड, रोग व तणनियंत्रण उपायांचा अल्प प्रमाणात वापर, वेळेवर व पुरेशा प्रमाणात शेतमजुरांच्या उपलब्धतेतील अडचणींमुळे रोप लावणी करताना लागणारा अधिक कालावधी, त्याला कारणीभूत असल्याचे मत जानकार व्यक्त करीत आहेत. 

हेक्‍टरी उत्पादकता वाढवण्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या विशेषतः सुधारित भात जातींच्या लागवडीखालील क्षेत्रात विशेष अनुदान देण्यात यावे. 
सुमेध बेले 
धान उत्पादक 

संकरित भातनिर्मितीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. आपल्या भागात खरीप व उन्हाळी हंगामात भाताची लागवड केली जाते. त्यात पारंपरिक वाणाचीही लागवड केली जावी. 
सुधाकर मुरूस्कर 
धान उत्पादक 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com