महाबीजचे श्रीराम धानाचे वाण उगवलेच नाही...कृषी केंद्र संचालकाने केली शेतकऱ्याची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

गिधाडी येथील शेतकरी विजय मेंढे यांनी गोंदिया येथील जय भारत सेवा कृषी केंद्रातून श्रीराम धानाचे पाच पोती बियाणे व इतर वाण 29 मे रोजी खरेदी केले होते. या धानाची पऱ्हे (खार) लागवड 10 जून रोजी बांधावर केली. परंतु 10 ते 12 दिवस होऊनही श्रीराम धानाचे बियाणे उगविले नाही.

गोरेगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील गिधाडी येथील शेतकरी विजय रमेश मेंढे यांनी गोंदिया येथील जय भारत सेवा कृषी केंद्रातून खरेदी केलेले श्रीराम धानाचे बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे कृषी केंद्र संचालकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्याने केली आहे. न्यायासाठी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे.

गिधाडी येथील शेतकरी विजय मेंढे यांनी गोंदिया येथील जय भारत सेवा कृषी केंद्रातून श्रीराम धानाचे पाच पोती बियाणे व इतर वाण 29 मे रोजी खरेदी केले होते. या धानाची पऱ्हे (खार) लागवड 10 जून रोजी बांधावर केली. परंतु 10 ते 12 दिवस होऊनही श्रीराम धानाचे बियाणे उगविले नाही.

शेतकऱ्याची कृषी विभागाकडे तक्रार

यासंदर्भात शेतकऱ्याने कृषी केंद्र संचालकांची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे शेतकऱ्याने तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. शेतकरी मेंढे यांनी धानाची उत्पादकता वाढविण्यासाठी नवीन धानाचे वाण गोंदिया येथील जय भारत सेवा कृषी केंद्रातून महाबीज श्रीराम 5 पोती, 1010 धान 1 पोते, पाटरू 3 पोती, एमटीयू 2 पोती, 3 किलो तुरीचे वाण महाबीज कंपनीकडून 29 मे रोजी खरेदी केले. यासाठीचे 7 हजार 910 रुपयांचे बिलही अदा केले.

खार 25 टक्केच उगविली

त्यानंतर कृषी केंद्र संचालकाने शेतकऱ्याला विक्री पावती देऊन 5 दिवसांत 100 टक्के बियाण्यांची उगवण होते, असे सांगितले. त्यानुसार शेतकऱ्याने आपल्या शेतात धानाचे (पऱ्हे (खार) टाकले. त्यात खतही टाकले. परंतु 15 दिवस लोटूनसुद्धा ही खार 25 टक्केच उगविली. त्यामुळे शेतकऱ्याने कृषी केंद्र संचालकाकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. मात्र कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्याला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या शेतकऱ्याने केंद्र संचालकाच्या सहकार्याने महाबीज कंपनीकडे तक्रार दाखल केली.

दंडात्मक कारवाई करण्यात यावी

त्यानंतर महाबीज कंपनीने 19 जूनला सहाय्यक क्षेत्र अधिकारी आनंद गावंडे यांना पऱ्हे पाहणीसाठी गिधाडी येथे पाठविले. गावातील शेतकरी यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. श्रीराम धानाची खार केवळ 25 टक्केच उगविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी मेंढे यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक मोरे, गटविकास अधिकारी झामसिंग टेंभरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी मेंढे यांनी केली आहे.

जाणून घ्या : या शिक्षकांवर का आली मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ...वाचा सविस्तर
 

 

दुसरे वाण कंपनी देणार
श्रीराम धानाची पेरणी शेतकऱ्याने योग्यवेळी केली आहे. पण ती खार 25 टक्केच उगविली आहे. तिचा पंचनामा करण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी हा वाण खरेदी केला आहे. त्या शेतकऱ्यांचीही खार पाहण्यात येईल. त्यांना दुसरे वाण कंपनी देणार आहे.
- आनंद गावंडे, सहाय्यक क्षेत्र अधिकारी, महाबीज कंपनी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahabeej's Shriram grain seeds have not germinated at gondia