यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते संभ्रमात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics Political activists confused shiv sena new group eknath shinde Cabinet post

यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते संभ्रमात!

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय घडामोडींनी शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेचेही लक्ष वेधून घेतले. तब्बल दहा दिवसांनंतर नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात सत्तांतर झाले. शिवसेनेतील एक गट वेगळा झाल्याने सेनेचे काही नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत दिसून आलेत. सोबतच आता येऊ घातलेल्या राज्यमंत्रिमंडळात आपापल्या नेत्यांना स्थान मिळते की नाही, याबाबत सत्ताधारी गट व पक्षातील समर्थकांत उत्सुकता दिसून येत आहे.

शिवसेनेच्या 56 वर्षांच्या वाटचालीनंतर गेल्या 20-21 जूनला पक्षात झालेले बंड हे यापूर्वीच्या बंडांपैकी सर्वांत मोठे बंड असल्याचे बोलले जात आहे. या बंडाचे केंद्रस्थानी होते दोन दिवसांपूर्वीच राज्याचे 30वे मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे. यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार व माजी मंत्री संजय राठोड हेदेखील शिंदे गटात सहभागी झाल्याने त्यांच्या पक्षाचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यातही मोठी खळबळ निर्माण झाली.

या बंडाचा निषेध करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिकांनी यवतमाळ शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करून संतापही व्यक्त केला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची भूमिका पराग पिंगळे, विश्‍वास नांदेकर व राजेंद्र गायकवाड या तीनही जिल्हाप्रमुखांसह यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संतोष ढवळे आदी सर्वांनीच लगेच जाहीर केली. या बंडाच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात जिल्ह्यातील जुने, ज्येष्ठ शिवसैनिकांसह अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यातूनच त्यांनी शिवसेना व पक्षप्रमुखांसोबतच असल्याचेही दाखवून दिले.

अशाप्रकारे आश्‍चर्यकारक व अनपेक्षितपणे होणार्‍या या नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर जिल्ह्यातील सर्वच पक्षाचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य नागरिकही आता पुढे काय, याकडे लक्ष ठेवून असल्याचे काही संभ्रमावस्थेत दिसून आले. गेल्या 20-21 जूनपासून मुंबई, सुरत, आसाम, गोवा व त्यानंतर मुंबई असा प्रवास झालेल्या या राजकीय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे यांनी म्ुख्यमंत्रिपदाची व भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

सर्वांसाठीच अनपेक्षित झालेल्या या नाट्यमय घटनाक्रमानंतर आता राज्यातील येऊ घातलेल्या मंत्रिमंडळात शिंदे गट व भारतीय जनता पक्षातील आमदारांपैकी नेमकी कुणाची वर्णी लागते, याकडे त्या-त्या आमदारांच्या समर्थकांसह त्यांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे लक्ष लागले आहे.

तिघांपैकी संधी नेमकी कुणाला?

यवतमाळ जिल्ह्यातील आमदारांपैकी माजी मंत्री संजय राठोड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके व मदन येरावार हे दोन्ही मागील युतीच्या सरकारमध्ये मंत्री होते. म्हणून जिल्ह्यातील या तीनही ज्येष्ठ व अनुभवी आमदारांना या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता या तिघांनाही मंत्रिपदाची संधी मिळते का, याबाबत समर्थकांसह कार्यकर्ते संभ्रमात दिसून येत आहेत.

Web Title: Maharashtra Politics Political Activists Confused Shiv Sena New Group Eknath Shinde Cabinet Post

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top