
सर्वत्र बंडखोरीचा पेच
अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोला पश्चिम या मतदारसंघांत राजकीय गुंतागुंत आहे. सर्वच पक्षांत इच्छुकांची गर्दी असली तरी एकालाच उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे इतर प्रबळ दावेदार नाराज झालेत. त्यांनी ती अपक्ष अर्ज दाखल करून व्यक्त केली आहे. सर्वांनाच बंडखोरीने ग्रासल्याने पुढील १५ दिवस उमेदवारांची चांगलीच कसोटी लागणार आहे.
विधानसभा 2019 : जिल्ह्यात गत दोन निवडणुकांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीची पाटी कोरी आहे. त्यांच्यासह आता दोन आमदारांवरून एकवर आलेल्या भारिप-बहुजन महासंघासाठीही यंदाची निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. विधानसभेची जिल्ह्यातील एकच जागा शिवसेनेला मिळाली आहे. या बाबी पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनाही अस्तित्व दाखवण्यासाठी धडपडणार आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. त्यापैकी २०१४ च्या निवडणुकीत अकोट, अकोला पूर्व व पश्चिम आणि मूर्तिजापूर हे चार मतदारसंघ भाजपने पटकावले होते. बाळापूरची जागा ‘भारिप-बमसं’ने राखली होती. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पाटी कोरीच राहिली. वंचित बहुजन आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले. यातही बाळापूरमध्ये भाजप आणि मित्र पक्षातील अनागोंदीचा फायदा ‘भारिप-बमसं’चे बळीराम सिरस्कार यांना झाला, ते दुसऱ्यांदा आमदार झाले. या वेळी त्यांनाच पक्षाने घरचा रस्ता दाखवलाय. पाच वर्षांत जिल्ह्यात खूप घडामोडी घडल्यात. भाजपने पाचही मतदारसंघांत केलेल्या बांधणीने विरोधकांना चांगलेच जेरीस आणले आहे. काँग्रेससह ‘भारिप-बमसं’पुढेही सक्षम उमेदवार निवडीचे आव्हान होते.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत दोन्हीही काँग्रेसतर्फे उमेदवार निवडीवरून चुरस होती. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी जिल्हा प्रतिष्ठेचा बनला आहे. केंद्रात मंत्रिपद मिळविल्यानंतर रामदास आठवले यांच्या ‘आरपीआय’ला जिल्ह्यात रिलाँचिंग करण्याचा प्रयत्न युतीकडून होताना दिसतोय. हे आव्हान नसले तर धोक्याची चाहूल निश्चितच आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी आणि ‘भारिप-बमसं’साठी अकोला होमपिच आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष ॲड. आंबेडकरांच्या जिल्ह्यातील कामगिरीवर राहणार आहे.
अल्पसंख्याकांवर डोळा
जिल्ह्यातील पाचपैकी दोन मतदारसंघांत अल्पसंख्यांकांची मते निर्णायक आहेत. अकोला पश्चिम आणि बाळापूर मतदारसंघातील या मतांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा डोळा राहणार आहे. तर ‘एमआयएम’कडून दोन्ही मतदारसंघांत उमेदवार देण्यात आल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होऊ नये, यासाठीही काँग्रेस आघाडीला प्रयत्न करावे लागतील. २०१४ च्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्यानंतर अकोला पश्चिममध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला अधिक मते मिळाली होती. दुसरीकडे बाळापूरमध्येही मुस्लिम मतांसह मराठा समाजाची मते गृहीत धरून राष्ट्रवादीने केलेला दावा काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी मान्य केलाय. अकोला पश्चिममध्ये मुस्लिम उमेदवार दिला असल्याने काँग्रेस आघाडीला अल्पसंख्यांकांची एकगठ्ठा मते मिळणार असली तरी बाळापूरमध्ये मतांचे विभाजन टाळताना कसोटी लागणार आहे.