Vidhan Sabha 2019 : गडचिरोली जिल्हा : अंतर्गत रुसवे मिटवण्याचे आव्हान

सुरेश नगराळे
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

‘वंचित’चा प्रभाव नाही
बहुजन वंचित आघाडीने गडचिरोलीतून गोपाल मगरे, आरमोरीतून रमेश कोरचा, तर अहेरीतून ग्रामसभांचे प्रमुख ॲड. लालसू नागोची यांना मैदानात उतरवले आहे. मात्र, लोकसभेचा विचार करता विधानसभेच्या निवडणुकीत वंचित आघाडीचा फारसा प्रभाव दिसून येत नाही.

प्रमुख मुद्दे

  • जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण 
  • औद्योगीकरणातले मागासलेपण कायम
  • रेल्वे, गोंडवाना विद्यापीठाच्या जमिनीचा प्रश्‍न 
  • पेसा कायद्याचा विरोध 
  • रस्ते आणि पुलाची समस्या

विधानसभा 2019 : गडचिरोली जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत थेट, तर अहेरी मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र आहे. येथे आघाडीचे दोन उमेदवार मैदानात असल्याने भाजप कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. भाजप आणि काँग्रेसच्या काही इच्छुकांना डावलल्याने प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या उमेदवारांसमोर अंतर्गत रुसवे-फुगवे मिटवण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून, गेल्या निवडणुकीत तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आलेत, त्यामुळे यंदा काँग्रेस- राष्ट्रवादीला मोठी कसरत करावी लागणार आहे. अहेरी वगळता राष्ट्रवादीचा अन्य दोन मतदारसंघांत फारसा प्रभाव नाही. मात्र, अहेरीतही काँग्रेसने राष्ट्रवादीला जागा सोडलेली नाही, त्यामुळे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार येथे मैदानात उतरले आहेत. दोन्ही काँग्रेसमधील हा बेबनाव भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम यांच्यासाठी जमेची बाजू आहे.

धर्मरावबाबा आत्राम आणि दीपक आत्राम यांनी भाजपकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला होता. मात्र, भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्या दोघांनाही संधी मिळाली नाही. शेवटी धर्मरावबाबांनी राष्ट्रवादीकडून, तर दीपक आत्राम यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल केला. भाजपने पुन्हा अम्ब्रीशराव आत्राम यांच्यावर विश्‍वास टाकलाय.

गडचिरोली मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी डॉ. नामदेव उसेंडी यांचा पराभव केला होता. या मतदारसंघात गडचिरोली, चामोर्शी आणि धानोरा हे तीन तालुके येतात. या मतदारसंघात कुणबी आणि तेली समाजाचे प्राबल्य आहे. आरक्षणाची टक्केवारी घटल्याने ओबीसी मतदार प्रमुख पक्षांवर नाराज आहेत. त्यात मराठा सेवा संघाने आपला उमेदवार उभा केल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. गेली पाच वर्षे डॉ. देवराव होळी सातत्याने जनसंपर्कात होते. त्यांची ही जमेची बाजू असली, तरी अंतर्गत वाद त्यांना अडचणीचा ठरू शकतो.

या मतदारसंघात या वेळी भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी, अशा परंपरागत लढतीऐवजी शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) एन्ट्रीने तिरंगी लढतीचे चित्र आहे. दलित, ओबीसी मतदार शेकापकडे गेल्यास ते काँग्रेससाठी फायद्याचे; तर भाजपसाठी नुकसानीचे ठरणार आहे.

‘वंचित’च्या भूमिकेवरही भाजप- काँग्रेसची मदार राहणार आहे. काँग्रेसकडून डॉ. चंदा कोडवते राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांच्या पाठीमागे काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार असल्याने या मतदारसंघात विजयासाठी भाजप उमेदवाराला कसरत करावी लागणार आहे.

आरमोरी मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत क्रिष्णा गजबे यांनी आनंदराव गेडाम यांचा पराभव करून काँग्रेसच्या विजयरथाला ब्रेक लावला. या मतदारसंघात सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांचे वर्चस्व असून, त्यांनी गेल्या निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे भाजपचे पारडे जड झाले. या मतदारसंघातील आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज आणि कोरची या तालुक्‍यांत माना, आदिवासी आणि ओबीसी मतदारांचे प्राबल्य आहे. आमदार क्रिष्णा गजबे हे माना समाजाचे असून, याचा त्यांना दुहेरी लाभ होण्याची शक्‍यता आहे. मात्र, भाजप समर्थक सुरेंद्रसिंह चंदेल हेही निवडणुकीच्या मैदानात असल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. काँग्रेसने पुन्हा आनंदराव गेडाम यांनाच मैदानात उतरविले, त्यामुळे येथे काँग्रेसविरुद्ध भाजप अशी लढाई होईल, असे चित्र आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 gadchiroli district politics