esakal | Vidhan Sabha 2019 : गोंदिया जिल्हा : बंडखोरीमुळे लढती चुरशीच्या
sakal

बोलून बातमी शोधा

Gondia-District

भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा गोंदियाची निवडणूक भाजप अन्‌ काँग्रेसलाही जड जाण्याची चिन्हे आहेत.

Vidhan Sabha 2019 : गोंदिया जिल्हा : बंडखोरीमुळे लढती चुरशीच्या

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

भाजपने विद्यमान तिन्हीही आमदारांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. गोंदिया वगळता तितक्‍याच ताकदीचे उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादीने उभे केलेत. मात्र गोंदिया, तिरोडा आणि आमगाव या तीन मतदारसंघांत प्रभावी बंडखोर उमेदवार रिंगणात उतरल्याने जिल्ह्यातील लढती चुरशीच्या होतील, यात शंका नाही. त्यातही यंदा गोंदियाची निवडणूक भाजप अन्‌ काँग्रेसलाही जड जाण्याची चिन्हे आहेत.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अर्जुनी मोरगाव, तिरोडा आणि आमगाव या मतदारसंघांत भाजपने विजयी पताका रोवली. गोंदिया विधानसभा मतदारसंघ मात्र काँग्रेसने गोपालदास अग्रवाल यांच्या रूपाने कायम ठेवला होता. पण, निवडणुकीची घोषणा होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ‘मी काँग्रेसचाच’ असे सांगणाऱ्या अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे गोंदियामधील सारीच समीकरणे बिघडलीत. इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. याचा आगडोंब काही दिवसांपूर्वीच भाजप कार्यकर्त्यांनी सभा घेऊन दर्शविलेल्या विरोधातून स्पष्ट झाला. पक्षाशी एकनिष्ठ विनोद अग्रवाल यांनी वेगळी चूल मांडली. त्यांना भाजप कार्यकर्त्यांचे समर्थन असले, तरी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांना आशीर्वाद दिल्याचे बोलले जाते. त्यामुळे गोपालदास अग्रवालांसाठी निवडणूक सोपी नाही. काँग्रेसने गोंदियातून अमर वराडेंना उमेदवारी दिली आहे.

तिरोडामधून भाजपने विजय रहांगडालेंना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने रविकांत बोपचेंना उमेदवारी दिली. आमदार रिपोर्ट कार्डात उत्तीर्ण विजय रहांगडालेंची विकासकामे पाहता पक्षाने तिकीट दिल्याचे बोलले जाते. मात्र, मतदार हे मानायला तयार नाहीत. तिकडे ऐनवेळी राष्ट्रवादीने माजी आमदार दिलीप बन्सोड यांना तिकीट नाकारून नवख्या रविकांत बोपचेंना तिकीट दिले. त्यामुळे बन्सोडसमर्थक नाराज आहेत. बन्सोडांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. बसपचा उमेदवारदेखील या मतदारसंघात निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे.

तिकडे आमगाव मतदारसंघ निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशझोतात आलाय. भाजपचे आमदार संजय पुराम यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे पुरामच नव्हे, तर सबंध जिल्हा चर्चेत आला. पक्ष त्यांना उमेदवारी देईल की नाही, यावर प्रश्‍नचिन्ह असताना त्यांनाच उमेदवारी मिळाली.

काँग्रेसने पुराम यांना टक्कर देण्यासाठी सहसराम कोरोटे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, माजी आमदार रामरतन राऊत यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडत बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे इथे तिरंगी सामना पाहावयास मिळेल.

अर्जुनी मोरगावमधून भाजपने आमदार राजकुमार बडोलेंना पुन्हा उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने मनोहर चंद्रिकापुरे यांना उमेदवारी दिली. हे दोन्ही उमेदवार कडवी झुंज देऊ शकतात. येथे आघाडीत बिघाडी होऊ शकते. लोकसभा निवडणुकीवेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला देण्याचे मान्य केले होते, असे काँग्रेसजन सांगताहेत. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आहे. ती नाराजी चंद्रिकापुरेंवर किती परिणाम करेल, यावर बरेच अवलंबून आहे.

loading image