
पुसद(जि. यवतमाळ) : आषाढापासून सणउत्सवांनी सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण उत्साहाने न्हाऊन निघते. प्रत्येक ठिकाणच्या प्रथा-परंपरा निराळ्या आणि आगळ्या. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पंढरपूरची वारी तर यंदा कोरोनाने हुकवलीच. पण माहुरगडची दत्त शिखरावरची चांदण्यातली परिक्रमाही यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सगळे सामुहिक धार्मिक कार्यक्रम रद्द होत आहेत.
अवघ्या महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माहूरगडाच्या दत्त शिखरावरून दर वर्षी राखी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात न्हाऊन निघणारी पवित्र परिक्रमा निघते. या यात्रेला कोरोनामुळे यंदा थांबा मिळाला आहे. त्यामुळे भाविक या परिक्रमा यात्रेला मुकणार आहेत.
यासंदर्भात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रशासनाच्या आदेशानुसार राखी पौर्णिमेला ता. 3 ऑगस्ट रोजी रात्री सुरू होणारी ही परिक्रमा रद्द करण्यात आली असल्याची माहिती श्री दत्तात्रय शिखर संस्थान माहूरगडचे सचिव प्राचार्य डॉ. गणेश पाटील यांनी दैनिक 'सकाळ'ला दिली.
वर्षातून एकदा ही परिक्रमा राखी पौर्णिमेला रात्रीच्या चंद्र प्रकाशात श्रीदत्त शिखरावरून निघते. यात महाराष्ट्रातील भाविक लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. परिक्रमा यात्रा अनुसया माता, मातृतीर्थ, रेणुका देवी, देवदेवेश्वर मंदिर, कैलास टेकडी अशी जंगलातील पाउलवाटेने वजरा येथील शेख फरीद धबधबा येथे पोहोचल्यानंतर भाविक सकाळी धबधब्यात अंघोळ करून अनुसया मातेच्या मंदिरात यात्रेची समाप्ती करतात. विशेष म्हणजे किर्र जंगलातील पाऊल वाटेने भाविक अनवाणी चालताना श्री दत्तगुरू नामाचा जयघोष करतात. यात लहानग्यांपासून वृद्ध सुद्धा काठी टेकवत श्रद्धेने परिक्रमेचा आनंद लुटतात.
सविस्तर वाचा - गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट, मूर्ती घडविणारे हजारो हात आर्थिक संकटात
माहूर गडाच्या इतिहासात कोरोनामुळे यंदा प्रथमच परिक्रमेत खंड पडत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी श्री दत्तात्रय शिखर संस्थानने यात्रा रद्द केली असून भाविकांनी परिक्रमेसाठी येऊ नये, असे आवाहन संस्थानच्या वतीने डॉ. गणेश पाटील यांनी केले आहे.
संपादन - स्वाती हुद्दार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.