दहावीच्या नवीन मूल्यमापनात व्याकरणात अलंकार आणि वृत्त वगळले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

नंदोरी (जि. वर्धा) : चालू सत्रात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता भाषा व सामाजिकशास्त्राकरिता अंतर्गत मूल्यमापन पुनश्‍च सुरू करण्यात आले आहे. त्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यात प्रथम भाषा मराठीकरिता व्याकरणाचे चार गुण कमी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

नंदोरी (जि. वर्धा) : चालू सत्रात इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता भाषा व सामाजिकशास्त्राकरिता अंतर्गत मूल्यमापन पुनश्‍च सुरू करण्यात आले आहे. त्याचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यात प्रथम भाषा मराठीकरिता व्याकरणाचे चार गुण कमी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
यंदा इयत्ता दहावीचे अंतर्गत गुण कमी करण्यात आल्याने दहावीचा राज्याचा निकाल घटला होता. त्याचा परिणाम अकरावीच्या तुकड्यांवर झाला. यात सीबीएसई मंडळाचे विद्यार्थी प्रवेशात समोर तर राज्य मंडळाचे विद्यार्थी मागे राहिल्याने राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 25 तज्ज्ञांची समिती नेमून अंतर्गत मूल्यमापनाचा पुन्हा आढावा घेतला. या समितीच्या शिफारशीनुसार इयत्ता नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा गुणांचे अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले आहेत. हे करीत असताना मागील शैक्षणिक वर्षात बदल करण्यात आलेल्या अनेक शैक्षणिक संकल्पनांना छेद देत मराठी विषयात व्याकरणाचे महत्त्व कमी केले आहे. विज्ञान आणि गणित विषयात पुन्हा एकदा पाठनिहाय गुण देण्यात आले आहे. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी व सामाजिकशास्त्र विषयांना अंतर्गत मूल्यमापन सुरू करण्यात आले आहे. प्रथम भाषा मराठीमध्ये व्याकरणाचे महत्त्व कमी केले असून चार गुणांची व्याकरण कमी करण्यात आले आहे. यामध्ये वृत्त आणि अलंकार हे व्याकरणातून वगळण्यात आले आहेत. तर विद्यार्थ्यांना सर्व पाठांचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने गणित विज्ञान विषयात पर्यायी प्रश्न बंद करण्यात आले होते. तसेच कोणत्या पाठावर किती गुणांचे प्रश्न येथील याची माहिती विद्यार्थ्यांना देणे बंद केले होते. मात्र, आता नव्याने करण्यात आलेल्या मूल्यमापन पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना पुन्हा कोणत्या पाठावर किती गुणांचे प्रश्न विचारले जाणार, याचा तपशील देण्यात आला आहे. यात किमान गुण व पर्यायांसह विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नांचे गुण असे दोन्ही पर्याय देण्यात आले आहेत.
मराठी विषयात 30 गुणांचे पर्यायी प्रश्न असणार आहेत तर विज्ञान आणि गणित यासाठी सुमारे वीस-पंचवीस गुणांचे पर्यायी प्रश्न असणार आहे. सध्या शिक्षकांकडे मूल्यमापनाचे आराखडे व्हॉट्‌सऍपवर आले आहेत. मात्र, अद्याप राज्य शिक्षण मंडळ आणि संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले नाहीत.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Marathi grammar of class 10 th Alankar and Vrutta excluded