मुख्यमंत्री साहेब, विकासाची घंटा वाजणार कधी? 

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

भंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वे ग्राउंडवर भंडारा नगरपालिकेची जुनी पितळी घंटा वाजवून आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन केले. आपल्या आगमनाच्या निमित्ताने त्यांनी शहराचा चेहरामोहरा बदलविण्यासाठी मोठा निधी देण्याची घोषणासुद्धा केली. परंतु, खऱ्या अर्थाने भंडारावासींसाठी घंट्याचा हा नाद विकासाची नांदी ठरेल की आवाज हवेतच विरून जाईल? अशी चर्चा सध्या रंगली आहे.

भंडारा व तुमसर या दोन्ही नगर परिषदांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. त्यांच्या येण्याचे औचित्य हे कार्यक्रमासाठी दिसत असले, तरी प्रत्यक्षात हे निमित्त मात्र वेगळेच होते. गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात सुरू असलेली उलथापालथ व बदलामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळेच स्थानिक भाजप नेत्यांच्या आग्रहाखातर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

तोंडावर असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपतर्फे वातावरणनिर्मिती व टेहळणीचे काम करण्याचा हेतू या दौऱ्यामागे होता. तुमसर व भंडारा या दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांत मुख्यमंत्र्यांनी येथील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये देण्याची घोषणा दिली. मात्र, ही घोषणा पोकळ ठरू नये. जिल्ह्यातील सर्वांत जुन्या व दीडशे वर्षे पूर्ण झालेल्या या नगरपालिकेत आतापर्यंत विकासाच्या नावाने नकारघंटाच वाजत आली. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचा घोषणेचा सुवर्णयोग या दोन्ही शहरांसाठी सुवर्णकाळ ठरावा, अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. 

वाद-प्रतिवाद 
मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अनेक कारणांमुळे चर्चेचा ठरला. तुमसरात मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळावरून वादाला तोंड फुटले. तुमसरचे माजी आमदार सुभाष कारेमोरे यांचे पुत्र डॉ. पंकज कारेमोरे व आमदार चरण वाघमारे यांच्यात खडाजंगी व धक्काबुक्की झाली. प्रकरण पोलिसांत गेले. भाजप कार्यकर्ते व आमदार समर्थकांनी धरणे देण्यापर्यंत वाद उफाळला. अखेर सुभाष कारेमोरे यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल झाला. आपला विरोध सभेला नसून सभास्थळावर लावलेल्या झाडांची तोड करण्याला असल्याचा खुलासा कारेमोरे यांनी केला. यानिमित्ताने दोन्ही गटांनी आपापले शक्तिप्रदर्शन करण्याची संधी सोडली नाही. 

सत्कार अन्‌ बहिष्कार... 
भंडाऱ्यातील रेल्वे ग्राउंडवरील सभेत मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना स्थानिक नगरसेवकांनी मात्र बहिष्कार टाकून बघ्याच्या भूमिकेत उभे राहणे पसंत केले. या कार्यक्रमांचे नियोजन करताना नगराध्यक्षांनी आम्हाला विश्‍वासात घेण्याचे मान देण्याचे टाळले, असा या सर्वांचा आरोप होता. त्यामुळे या कार्यक्रमात भाजपचे पदाधिकारी वगळता नगरपालिकेत सत्ता असलेल्या भाजपचे एकही नगरसेवक, सभापती मंचावर वा मंचानजीकही उभे नव्हते. काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत वादाचे हे जणूकाही जाहीर प्रदर्शन होते. एकंदरीत या कार्यक्रमात आमदार परिणय फुके व नगराध्यक्ष मेंढे यांचा एकछत्री अंमल असल्याने नगरसेवकांची नाराजी दिसून आली. 

पालकमंत्र्यांचा जनतादबार 
सहपालकमंत्रिपदावरून जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. खासदारांचा राजीनामा व अन्य कारणांमुळे तब्बल सहा महिन्यांनंतर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत श्री. बावनकुळे यांनी जिल्ह्यातील रखडलेली विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी खेचून आणण्याचे सूतोवाच केले होते. अधिकृत पालकत्व स्वीकारल्यानंतर ते प्रथमच शनिवारी आपल्या जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी व गाऱ्हाणे जाणून घेणार आहेत. जिल्ह्याचे अवजड व फ्रॅक्‍चर धनुष्य पेलण्याची 'ऊर्जा' ऊर्जामंत्र्यांना मिळेलच, अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com