पतीच्या उपचारासाठी जिंकली होती मॅरेथॉन स्पर्धा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

एका इंग्रजी दैनिकात लता भगवान करे यांची संघर्ष गाथा वाचून हैदराबाद येथील नवीन देशागोईना यांनी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविला. ही बाब बुलडाणा जिल्ह्यासाठी भूषण ठरावी अशीच आहे. मात्र, या चित्रपटाला जिल्ह्यातील एकाही सिनेमागृहाने दाखविले नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

खामगाव  : माझ्या जीवनावर चित्रपट निघाला, मात्र मी राहते, त्याच मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्यातील एकाही थिएटरमध्ये माझा चित्रपट अजून प्रदर्शित झाला नाही, साधे पोस्टर्सही जिल्ह्यात झळकले नाही, अशी खंत लता करे यांनी ‘सकाळ’ शी बोलताना व्यक्त केली.

 

 

लढवय्या मॅरेथॉन फेम आजीची संघर्ष गाथा

बुलडाणा जिल्ह्यातील मॅरेथॉन फेम आजीबाई लता भगवान करे यांच्या जीवन संघर्ष आणि प्रेरणादायी प्रवास आता चित्रपटाच्या माध्यमातून जगासमोर येत आहे. एका इंग्रजी दैनिकात लता भगवान करे यांची संघर्ष गाथा वाचून हैदराबाद येथील नवीन देशागोईना यांनी त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविला. ही बाब बुलडाणा जिल्ह्यासाठी भूषण ठरावी अशीच आहे. मात्र, या चित्रपटाला जिल्ह्यातील एकाही सिनेमागृहाने दाखविले नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल. हीच खंत लता करे यांना सुद्धा असून, आपला चित्रपट आपल्याच जिल्ह्यातील प्रेक्षकांनी दुर्लक्षित ठेवला याचे दुःख त्या बोलून दाखवतात. लढवय्या मॅरेथॉन फेम आजीची संघर्ष गाथा आता रुपेरी पडद्यावर मांडली गेली असून, लता करे, त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे या सामान्य कुटुंबातील संघर्ष, जगण्याची धडपड हे चित्रपटाचे कथानक आहे. हा चित्रपट मराठी भाषेत आहे.

 

कोण आहेत लता करे?
लता भगवान करे खामगाव तालुक्यालगतच्या मोहना या खेडे गावातील रहिवासी आहेत. त्यांचे पती भगवान करे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. मुलगा सुनील करे हा बारामती येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. काही वर्षांआधी त्याने आई-वडिलांना सुद्धा बारामती येथे आपल्याकडे नेले होते. तेथे लता करे यांचे पती भगवान करे यांची प्रकृती बिघडली आणि त्यांच्या उपचारासाठी लता करे यांनी केलेला संघर्ष थक्क करणारा आहे.

हेही वाचा - पालकमंत्र्यांची अकोला जिल्ह्यात राजकीय मोट
आजीने जिंकली मॅरेथॉन

पतीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने लता करे चिंतेत होत्या. तेव्हा बारामतीमध्ये मॅरेथॉन स्पर्धा होती. वयाची साठी ओलांडलेल्या लता करे स्पर्धेत धावल्या आणि ५ हजार रुपये बक्षीस जिंकले. सन २०१३, १४ आणि १५ अशा सलग तीन स्पर्धेत सहभागी होऊन त्यांनी बक्षिसे मिळवली. या आजीचा प्रेरणादायी प्रवास मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमात चांगलाच झळकला, तो वाचून त्यांच्या जीवन प्रवासावर आता चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

प्रेक्षकांनी हा चित्रपट अवश्य बघावा
माझा जीवन संघर्ष आज चित्रपट रुपाने जगासमोर आला आणि माझ्या फाटक्या आयुष्याचे सोनं झालं. हैदराबाद येथील दिग्दर्शक माझा चित्रपट काढतात मात्र स्वतःच्या मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील एका ठिकाणी अजून हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही, याची खंत आहे. मी खामगाव, शेगाव, मलकापूर येथे जावून चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत विनंती करणार आहे, प्रेक्षकांनी हा चित्रपट अवश्य बघावा.
-लता भगवान करे, मॅरेथॉन फेम आजी, बुलडाणा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathon was won by husband for treatment!