esakal | हाय रे कोरोना, कसे आले दिवस... गावाच्या वेशीवर आटोपले मुलीचे लग्न! 
sakal

बोलून बातमी शोधा

Marriage of Daughter held out of village due to corona

नवरदेव रेडझोन असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असल्याने नवरदेवासह इतर मंडळींनी आरोग्य तपासणी केल्याशिवाय त्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असे गावकऱ्यांनी वधूपित्यास कळविले.

हाय रे कोरोना, कसे आले दिवस... गावाच्या वेशीवर आटोपले मुलीचे लग्न! 

sakal_logo
By
भगवान पवनकर

मोहाडी (जि. भंडारा) : कोरोना व लॉकडाउनमुळे वर्तमानस्थितीत विवाह आता सोहळा राहिलेला नाही. विविध प्रकारची बंधने आल्यामुळे केवळ चारचौघात होणारे लग्न म्हणजे केवळ औपचारिकता झाली आहे. मुलीचे लग्न थाटामाटात व धुमधडाक्‍यात करण्याच्या इच्छेला पित्याने मुरड घातली. परंतु, नवरदेव कोरोना प्रभावित क्षेत्रातील (रेडझोन) असल्याने सर्वांच्या तपासणीची अट समोर आली. त्यामुळे घराच्या अंगणात नव्हे, तर वधूपित्याला मुलीचे लग्न चक्क गावाच्या वेशीबाहेर लावावे लागले. तासाभरातच सगळा विवाहकार्यक्रम आटोपून नवरी मुलगी सासरी रवाना झाली. 

पालडोंगरी येथील धर्मपाल रामटेके यांची मुलगी प्रणाली हिचा विवाह गिरजानगर भांडेवाडी, पारडी, नागपूर येथील सुशील पारस खोब्रागडे यांच्याशी ठरले होते. चार महिन्यांपूर्वी ठरलेल्या तारखेलाच लग्न करण्याचा आग्रह वरपक्षाने धरला होता. त्यानुसार वरपक्षाने नागपूर येथील उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकाऱ्याकडून तर वधूपित्याने उपविभागीय अधिकारी आपत्ती व्यवस्थापन भंडारा यांच्याकडून विवाहाची रीतसर परवानगी घेतली. नवरदेव रेडझोन असलेल्या नागपूर जिल्ह्यातील असल्याने नवरदेवासह इतर मंडळींनी आरोग्य तपासणी केल्याशिवाय त्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही, असे गावकऱ्यांनी वधूपित्यास कळविले.

अवश्य वाचा-  भंडारा जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधिताची भर, रुग्णसंख्या चारवर

बिट अंमलदार राजेश बाभरे, पोलिस पाटील विलास रामटेके, सरपंच सुरेखा खराबे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकडू पुडके यांनी वधुपिता धर्मपाल रामटेके यांच्याशी एक दिवस अगोदरच चर्चा केली. तसेच गावाबाहेरील शेतशिवारात शासन निर्देशाचे पालन करून लग्न लावण्यास संमती दिली. सोमवारी (ता. 18) मोजक्‍या पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रणाली आणि सुशील यांचा मंगलपरिणय झाला. दोन्ही पक्षांकडील नातेवाईकांशिवाय गावातून कोणीही उपस्थित नव्हते. सामाजिक दुरीकरण व सुरक्षेची काळजी घेऊन हा विवाह गावच्या वेशीवरच पार पडला. अल्पोपहार देऊन 
पाहुण्यांना रवाना करण्यात आले. गावच्या वेशीवर झालेल्या या लग्नाची चर्चा परिसरात रंगली होती. 

loading image