दिव्यांगत्वावर मात करीत गुंफली रेशिमगाठ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 December 2019

नेहमीप्रमाणे काल परवा राजे मंगल कार्यालयाच्या सुंदर हिरवळीवर एका स्वागत समारंभाला जाण्याचा योग आला. सगळ काही इतरांप्रमाणेच होतं. जेवणावर थाट माठ आणि सजलेले नवदांपत्य. परंतु, ज्यावेळी या नवदांपत्याचा दिव्यांगत्वावर मात करण्याचा प्रयत्न ऐकला तेव्हा जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर आपण कशावरही मात करू शकतो हे पटले. 

बुलडाणा : नेहमीप्रमाणे काल परवा राजे मंगल कार्यालयाच्या सुंदर हिरवळीवर एका स्वागत समारंभाला जाण्याचा योग आला. सगळ काही इतरांप्रमाणेच होतं. जेवणावर थाट माठ आणि सजलेले नवदांपत्य. परंतु, ज्यावेळी या नवदांपत्याचा दिव्यांगत्वावर मात करण्याचा प्रयत्न ऐकला तेव्हा जिद्द आणि आत्मविश्‍वासाच्या बळावर आपण कशावरही मात करू शकतो हे पटले. 

शहरातील गिरीश व सौ.नंदिनी वाईकर यांची कन्या प्रीती एवढीच माहिती होती. मात्र, प्रीतीच्या जन्मानंतर ती कोणत्याही आवाजाला प्रतिसाद देवू शकत नाही हे पाहिल्यानंतर आईवडिलांच्या काळजात शंकेने घर केले. 

तपासण्या झाल्यानंतर तिला कर्णबधिरत्व असल्याचे निष्पन्न झाले. अर्थात कर्णबधिर असल्यामुळे ऐकू शकत नाही व काही न ऐकल्यामुळे बोलूही शकणार नाही. अतिशय देखण्या आणि सुंदर प्रीतीला या दिंव्यागत्वावर मात करून सर्वसामान्य जीवन जगण्यासाठी उभे करायचे असा निश्‍चय गिरीश वाईकर यांनी घेतला. तज्ज्ञांच्या सल्ल्यानूसार येथील अपंग विद्यालयात तिचा प्रवेश झाला. आणि भाषेची जागा हावभाव आणि खाणाखूणांनी घेतली. लाडक्या लेकीसाठी आईनेही ही भाषा शिकून तिच्याशी संवाद सुरू केला. प्राथमिक शिक्षण घेतानाच प्रितीने नृत्यकलेतही आपली रुची दाखविली. बुलडाणा अर्बन गणेशोत्सवात उपस्थित प्रेक्षकांचा तिचे नृत्य पाहून ती दिव्यांग आहे यावर विश्‍वास बसला नाही. बुलडाण्यात सातवीपर्यंतच शिक्षण होईल. आठवीपासून पुढे काय, तर तिला लातूर येथे मुलींच्या मुकबधीर निवास विद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. जिद्दीच्या जोरावर तिने दहावीत 75 टक्के गुण मिळविले. पुढे नागपूरला अकरावी, बारावीचे शिक्षण घेत असताना तिची अनिकेतशी ओळख झाली. अनिकेतच्या कुटुंबीयांनीही प्रितीला आपलं केलं आणि तिच्या पालकांना रीतसर मागणीच घातली. यावर तिने आणखी शिक्षण घेण्याची जिद्द दाखविली. तिला पुढील शिक्षणासाठी हैदराबादलाही पाठविले. बी.कॉम करतानाच टायपिंग व कॉम्प्युटरचेही शिक्षण घेतले. दुसरीकडे अनिकेतही शिक्षण पूर्ण करून पुण्यातील एका कंपनीत नोकरीला लागला. प्रितीचेही शिक्षण झाल्याने नागपूरकर चौधरींनी प्रीतीच्या कुटुंबीयांकडे पुन्हा चौकशी केली आणि या दोघांच्या सहजीवनाचा प्रवास सुरू करण्याचे निश्‍चित झाले. नुकतेच 3 डिसेंबरला मोठ्या धुमधडाक्यात प्रितीने अनिकेतच्या सहजीवनात प्रवेश करून दिव्यांगत्वावर मात करून सर्व सामान्य मुलांप्रमाणे प्रगतीची वाट धरून सोनेरी भविष्य निर्माण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून वैवाहिक जीवनाला सुरवात केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marriage of a disabled girl