भूसुरुंग स्फोटातील संशयितांसाठी गावकऱ्यांचा माफिनामा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

गडचिरोली : कुरखेडा तालुक्‍यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी 1 मे 2019 घडवून आणलेल्या शक्तिशाली भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले. या घटनेचा तपास करताना लवारी येथील सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आता या गावातील नागरिकांनी ग्रामसभा घेऊन 49 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना दिले असून 'ते सहा जण दोषी आहेत. पण त्यांना एक वेळ माफी द्यावी' अशी मागणी केली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

भूसुरुंग स्फोट प्रकरणात लवारी येथील परसराम माणिकराम तुलावी, दिलीप श्रीराम हिडामी, सोमसाय दलसाय मडावी, किसन सीताराम हिडाम, सकरू रामसाय गोटा आणि प्रकाश किसन हिडामी या सहा जणांना अटक करण्यात आली. सध्या हे सहाही जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. लवारीच्या ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील तरुणांना फितवून नक्षलवाद्यांनी आपल्याबरोबर घेतले आणि जांभुळखेडा येथे घटना घडविली. नक्षल्यांमुळे आदिवासी समाजातील लवारी येथील तरुण पिढी उद्‌ध्वस्त होत आहे. तसेच नक्षली स्वतःच्या फायद्यासाठी तरुणांचा वापर करीत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी लवारी ग्रामसभेने पुढाकार घेऊन नक्षल्यांना गावात परत पाय ठेवू देणार नाही तसेच नक्षल गावबंदीचा ठराव ग्रामसभेमार्फत घेण्यात येणार असून गावामध्ये पोलिस विभागाने जनजागरण मेळाव्याचेही आयोजन करावे, असेही पत्र पुराडा पोलिस ठाण्यात दिले आहे. नक्षली हे आदिवासींना जल, जंगल व जमिनीसाठी व त्यांच्या हक्कांसाठी लढत असल्याचे सांगतात. परंतु हा त्यांचा खोटारडेपणा लवारी येथील नागरिकांनी जनतेसमोर आणला आहे. नक्षल्यांना आदिवासी समाजाच्या विकासाबद्दल काहीही देणे घेणे नाही. आदिवासी समाजाच्या हितासाठी लढत असल्याचे एकीकडे भासवून दुसरीकडे आदिवासी तरुणांना वाममार्गाला लावण्याचे काम नक्षली करीत आहेत. यातून आदिवासींचा फायदा नाही तर नुकसानच होत असल्याने यापुढे आमच्या गावातून कुठल्याही प्रकारचे सहकार्य नक्षलवाद्यांना करणार नाही. मात्र अटक केलेल्या आमच्या गावातील त्या सहा जणांना माफ करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी द्यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे निवेदनातून केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mass apology of Villagers for suspects in blast