बाळंतीणच्या हाती हवी "मातोश्री बेबी किट'

केवल जीवनतारे
सोमवार, 16 डिसेंबर 2019

29 जानेवारी 2019 मध्ये तत्कालीन महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाच्या पुढाकारातून "मुख्यमंत्री शिशू स्वागत किट' देण्याची घोषणा केली. उद्‌घाटन करताना पाच महिलांना बेबी किट उपलब्ध करून दिली. परंतु, यानंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही.

नागपूर ः तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी रुग्णालयात स्वस्त दरात न्याहारी, भोजन देणारी योजना सुरू करतानाच गरीब महिलांसाठी प्रसूतीदरम्यान "शिशू केअर किट' उपलब्ध करून देण्याची कल्याणकारी योजना राबवली होती. या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना राबवून बाळंतीण महिलेच्या हाती तिच्या बाळाच्या देखभालीसाठी "बेबी केअर किट' उपलब्ध करून द्यावी, असे वृत्त दै. "सकाळ'ने दोन वर्षांपूर्वी प्रकाशित केले होते. याची दखल घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने "मुख्यमंत्री शिशू स्वागत किट' देण्याची घोषणा केली. मात्र, अद्याप योजनेचा नारळ फोडला नाही. आता उद्धव ठाकरे सरकारने "मातोश्री बेबी केअर किट' असे नामकरण करून ही योजना सुरू करावी.

 

हे ही वाचा - बिबट्याची शिकार : एका जवळ मिशी, दुस-याकडे नखे; 

 

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आरोग्य विभागात निवडक प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविकांनी गरीब मातांसाठी सुरू केलेल्या "बेबी केअर किट' उपक्रमाला व्यापक रूप द्यावे. सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालयापासून तर उपकेंद्रात "मातोश्री शिशू केअर किट' उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून गरीब महिलांना त्यांच्या चिमुकल्या शिशूंना पुढील वर्षभर या बेबी कीटचा लाभ होईल, अशी मागणी शिवसेनेचे उपराजधानीतील संपर्क नेते चंद्रहास राऊत यांनी केली होती. याच मागणीचा आधार घेत दै. सकाळने "बेबी केअर किट'चे प्रकरण लावून धरले होते.

यापूर्वी सुपर स्पेशालिटीचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी प्रथम तमिळनाडूच्या धर्तीवर "अम्मा बेबी केअर किट' सुरू करण्यासंदर्भात दै. "सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर सातत्याने या वृत्ताचा पाठपुरावा केला. 29 जानेवारी 2019 मध्ये तत्कालीन महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या विभागाच्या पुढाकारातून "मुख्यमंत्री शिशू स्वागत किट' देण्याची घोषणा केली. उद्‌घाटन करताना पाच महिलांना बेबी किट उपलब्ध करून दिली. परंतु, यानंतर या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली नाही. 11 महिने लोटून गेल्यानंतरही या किट वितरणासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही. केवळ योजना घोषित करून फोटो काढून घेतले. यामुळे शिवसैनिकांच्या माध्यमातून पुढे आलेली "मातोश्री बेबी केअर किट' सुरू करावी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

किट उपयोगी पडणार
आदिवासी तसेच दुर्गम भागात बऱ्याच वेळा नवजात बालकाला शेणाने सारवलेल्या जमिनीवर ठेवले जाते. यामुळे त्याला संसर्ग होण्याची भीती आहे. तसेच बालमृत्यू, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी "मातोश्री बेबी केअर किट' उपयोगी पडणार आहे. नवजात बालकांना ब्लॅंकेट, मच्छरदाणी, छोटा नेलकटर, इलेक्‍ट्रॉनिक थर्मामीटर, झोपण्याची लहान गादी, प्लास्टिक लंगोट, हातमोजे, पायमोजे या किटमध्ये असावे, हीच शिवसैनिकांची इच्छा आहे.
- चंद्रहास राऊत,
माजी संपर्कप्रमुख, नागपूर विभाग, शिवसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matoshree Baby Kit for women