भारत हिंदू नव्हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

नागपूर : भारत हिंदू राष्ट्र असल्यानेच येथील मुस्लिम समाज आनंदी असल्याच्या आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्याचा बसप प्रमुख मायावती यांनी चांगलाच समाचार घेतला. सरसंघचालकांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे सांगून त्यांनी प्रथम सच्चर समितीचा अहवाल वाचावा, असा टोला लगावत भारत हिंदू नव्हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असल्याचे मायावती यांनी सांगितले. 

बसप उमेदवाराच्या प्रचारार्थ इंदोरा मैदान येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ, वीरसिंग, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, विवेक हाकडे, प्रफुल मानके उपस्थित होते. मायावती म्हणाल्या की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच देशाची एकता आणि अखंडत्वाचा विचार मांडला. त्यांनी कोणत्याही एका धर्माला स्थान दिले नाही. भारत हिंदू राष्ट्र नाही तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. महागाई आणि गरिबी, बेराजगारीसाठी कॉंग्रेस, भाजपचे धोरण जबाबदार असल्याची टीका केली. देशाची अर्थव्यवस्था बिघडण्याला भाजपच्या धेय्यधोरणांना जबाबदार ठरवले. 
सेवांचे खासगीकरण मोठे षड्‌यंत्र 
आरक्षण नको असणारे लोक सत्तेत आहेत. हळूहळू आरक्षण कमी करण्याचा डाव त्यांचा आहे. त्यामुळे सर्व संस्थांचे खासगीकरण केले जात आहे. सरकारी सेवांचे खासगीकरण हे मोठे षड्‌यंत्र आहे. मोजक्‍या लोकांना फायदा पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहेत. हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन मायावती यांनी केले. 
योग्य वेळी दीक्षा घेऊ 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आजच्या दिवशी म्हणजेच 14 ऑक्‍टोबरला बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. मी केव्हा दीक्षा घेणार, घेणार असा प्रश्‍न मला विचारला जातो. मात्र, योग्यवेळी आपण दीक्षा घेणार असून त्यावेळी संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात धर्म परिवर्तन होईल. आपल्याकडे सत्ता येईल, तेव्हाच हे संभव होईल, असेही यावेळी मायावती यांनी सांगितले.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayawati, India is a secular nation not Hindu