मांजराच्या खवल्यांचा वीस लाखांत ठरला सौदा, सापळा रचून घेतले ताब्यात

संतोष ताकपिरे
Friday, 2 October 2020

गौरव अरुण वानखेडे (वय 20, जौदनखेडा जि. बुलडाणा), सेतरसिंग फडा भांबर (वय 44, जामठी, मध्यप्रदेश) व कार्तिक भगवान हांडके (वय 30, रा. सावजीफैल, मलकापुर) अशी अटक तिघांची नावे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अमरावती  : वनविभागाच्या शेड्यूल्ड-वनच्या कक्षेत येणाऱ्या खवल्या मांजराचे शंभर खवले घेण्याची डील वीस लाख रुपयांमध्ये ठरली होती. मात्र, मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या वनगुन्हे अन्वेषण विभागाने हा डाव उधळून मोताळा वनपरिक्षेत्राच्या मलकापूर येथे सापळा रचून तिघांना अटक केली.

शुक्रवारी (ता. दोन) वनविभागाने ही कारवाई केली. गौरव अरुण वानखेडे (वय 20, जौदनखेडा जि. बुलडाणा), सेतरसिंग फडा भांबर (वय 44, जामठी, मध्यप्रदेश) व कार्तिक भगवान हांडके (वय 30, रा. सावजीफैल, मलकापुर) अशी अटक तिघांची नावे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या तिघांनाही सहाय्यक वनसंरक्षक कॅम्प बुलडाणा (प्रादेशिक) येथील आर.आर. गायकवाड यांच्या ताब्यात देण्यात आले. 

एका नायलॉनच्या पिशवीत खवल्यांचे शंभर नग जप्त केले. काही दिवसांपूर्वी गौरव नामक युवकाने यु-ट्यूबवर यासंदर्भातील माहिती शेअर केली होती. काही व्हिडिओ व फोटो हे मुंबई येथील वनगुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघितले. त्यांनी काही दिवस प्रयत्न केले. त्यानंतर याप्रकरणाची चौकशी करण्यास मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या वनगुन्हे अन्वेषण विभागाला सांगितले. गौरव याने खवल्या मांजरांच्या शंभर खवल्यांची एकूण किंमत वीस लाख निश्‍चित केली होती. 

जाणून घ्या - नागपूरात सुरू आहे कोव्हॅक्‍सिन लसीचा प्रयोग!
 

येथील वन्यजीव तज्ज्ञ प्रा. सावन देशमुख, वनकर्मचारी आकाश सारडा यांनी त्यासंदर्भात आधी तिघांसोबत खवले घेण्यासाठी एक ग्राहक म्हणून व्यवहार सुरू केला. त्यानंतर त्यांनी सहाय्यक वनसंरक्षक कॅम्पचे आर. आर. गायकवाड यांच्याशी संपर्क साधून पुढचा प्लॅन रचला. वीस लाख रुपयांत खवले घेण्याच्या उद्देशाने वनविभागाची चमू मुलकापूर येथील एका हॉटेलच्या बाजूला गेली. त्याठिकाणी गौरव वानखेडे याला प्रथम बोलविले. एका दुकानात खवले बघितल्यानंतर गौरवने खेतरसिंग याला बोलविले. त्यानंतर हा माल चौकशी केल्यानंतर संबंधितांनी विकला. त्याचवेळी नमूद तिघांना पकडले.
 

वनविभागाच्या मदतीने पकडले 
शेड्यूल्ड वन अंतर्गत येणाऱ्या खवल्या मांजरांच्या खवल्यांचा उपयोग चायना मेडिसीन तयार करण्यासाठी केला जातो. मेळघाट वनगुन्हे अन्वेषण विभागाच्या चमूला त्याबाबत माहिती होती. त्यामुळे बुलडाणा (प्रादेशिक ) वनविभागाची मदत घेऊन या तस्करांना पकडले.
- एम. एस. रेड्डी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्रप्रकल्प, अमरावती.

संपादन  : अतुल मांगे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Melghat Forest Crime Investigation Department arrested three persons