कुटुंब नियोजनात पुरुष ‘नामानिराळे’च!

दत्ता महल्ले
शुक्रवार, 20 डिसेंबर 2019

पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कुटुंबनियोजनाचा भार अद्यापही महिलांच्याच खांद्यावर आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण हे नगन्य असल्याचे दिसून येते.

वाशीम : वैवाहिक दाम्पत्यांमध्ये आपत्य प्राप्तीनंतर कुटुंब नियोजनाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्या जातो. मात्र, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकरिता स्त्रीलाच सामोरे जावे लागते. त्यामुळे पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये कुटुंबनियोजनाचा भार केवळ महिलांच्याच खांद्यावर असल्याचे दिसून येते. ही बाब जिल्ह्यात गत तीन वर्षांत 4451 स्त्रीयांची तर, केवळ 28 पुरुषांची नसबंदी झाल्यावरून स्पष्ट होते.

संसाराचा गाडा पती-पत्नी या दोन चाकांवर चालतो. ‘हम दो, हमारे दो’ अशा छोट्या कुटुंबाला पती-पत्नीकडून प्राधान्य दिल्या जाते होते. मात्र, सध्यस्थितीत आता बहुतांश कुटुंब एकच अपत्य पुरेसे असल्याचे सांगून, संतती नियमन करतात. त्यामुळे वैवाहिक जीवनात ठरावीक वेळेनंतर पती-पत्नी मिळून कुटुंब नियोजनाचा निर्णय घेतात. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया ही पुरुष व स्त्री या दोघांनाही करता येते. मात्र, कुटुंब नियोजनाची जबाबदारी ही स्त्रीच पेलताना दिसून येते. बहुतांश वेळा स्त्रिया ह्या स्वतःहून ही स्वीकारताना दिसून येतात. तसेच नसबंदीबाबत पुरुषांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज देखील आहेत. 

दोन वर्षांत केवळ 4 पुरुषांची नसबंदी
जिल्ह्यात गत तीन वर्षांत झालेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये 4451 स्त्रिया, तर केवळ 28 पुरुषांनी नसबंदी केली. 2017 मध्ये 20 पुरुषांची नसबंदी झाली. त्यानंतर हे प्रमाण घटून 2018 व 2019 या दोन्ही वर्षांत प्रत्येकी 4 पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे पुरुष नसबंदीचे प्रमाण हे नगन्य असल्याचे दिसून येते.

गत तीन वर्षांत झालेल्या कुटुंबनियोजनाची आकडेवारी
वर्ष....... उद्दिष्ट ..... पुरुष...... स्त्री.........बिनटाका....एकूण......टक्केवारी
2017...1182.....20.....1206.......40........1266....107.11
2018...1217.....04.....1437.......61........1502....123.42
2019...1234.....04.....1622.......86........1712....138.74

पुरुष नसबंदी का टाळली जाते?
-नसबंदीने नपुसंकता येण्याचा गैरसमज
-स्त्रियांकडून पुरुष नसबंदीला होणारा विरोध
-पुरुष सहजासहजी तयार होत नाहीत
-स्त्रियांनीच नसबंदी करावी ही पारंपरिक मानसिकता
-पुरुष नसबंदीविषयी अंधश्रद्धा असणे

गैरसमज दूर होणे काळाची गरज
वाशीम जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. यामागे अनेक कारणे देखील आहेत. बहुतांश कारणे ही गैरसमजामुळे निर्माण झालेली आहेत. स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सोपी आहे. त्यामुळे पुरुष नसबंदीबाबत असलेले गैरसमज दूर होणे काळाची गरज आहे.
-डॉ. अनिल कावरखे, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशीम
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Men in Family Planning are 'Nameless'!