एकीचं महत्त्व पटवून देणारं महाराष्ट्रातील 'अनोखं' गाव, वाचा एका गावाची भन्नाट गोष्ट

Mendha -Lekha- village
Mendha -Lekha- village

पुणे : आज काल बऱ्याच ठिकाणी म्हणजेच शहरात, गावाच्याबाबतीतील कोणतेही निर्णय घेताना गावकरी मिळून सामूहिक निर्णय घेण्याचं प्रमाण कमी झाल्याचं दिसतंय. परंतु आपल्या महाराष्ट्रातील एक गाव असे आहे की, जे गाव आजही 'गाव म्हणजे आपला एक परिवार' हे धरूनच गावातील कोणतेही काम एकजुटीने करत असतात. या गावाची एकी, गावकऱ्यांची जिद्द आणि प्रमाणिकपणा यामुळे या गावाची एक खास ओळख तयार झाली आहे. त्याच गावाची महती आज जाणून घेण्याचे कारण म्हणजे नऊ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गावाच्या परिसरातील वनावर सामुहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे गाव ठरले. चला तर मग त्याच गावाबद्दल जाणून घेऊयात.

मेंढा लेखा हे गाव महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील गाव आहे. गडचिरोली शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. या गावाची लोकसंख्या जेमतेम 500 च्या आसपास आहे. गावातील वनक्षेत्र 1,806 हेक्टर तर शेतीचे क्षेत्र 87 हेक्टर आहे. शेत जमिनीवर व्यक्तिगत व जंगलावर सामुहिक हक्क या गावाने प्राप्त केला आहे. गावाच्या परिसरातील वनावर सामुहिक हक्काचा दावा मान्य करून घेणारे 'मेंढा लेखा' हे देशातील पहिले गाव ठरले आहे. हा दावा 28 ऑगस्ट 2009 रोजी मान्य झाला आहे. 13 डिसेंबर 2009 ला तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते सामूहिक वनहक्क अभिलेख ग्रामसभेला देण्यात आला. या गावातील ग्राम सभेचे महत्त्व त्याचे अधिकार आणि अंमलबजावणी हे सारेच मेंढालेखाने संपूर्ण देशाला दाखवून दिले आहे. 

मेंढा लेखा गावातील देवाजी तोफा म्हणाले, गाव हा विकासाचा घटक आहे. आमचे गाव म्हणजे आमचा एक पूर्ण परिवार आहे. गांधीजींच्या कल्पनेतील ग्रामस्वराज्याची संकल्पना साकार करण्यासाठी गावातील लोकांनी पुढाकार घेतला आहे. आम्ही सर्वजण नेहमीच सरकारचा पाठपुरावा करत होतो. याआम्ही सर्वानी खूप प्रयत्न केला. त्यानंतर आता येथे सामूहिक निर्णयांच्या क्रांतीची बीजे आम्ही गावात रुजवली आहेत. तेव्हापासून आम्ही सर्वजण गाव पातळीवरील सर्व निर्णय एक जुटीने घेत आहे. 

ही आहे गावाची खास ओळख...

'आमच्या गावात आम्हीच सरकार, मुंबई दिल्लीत आमचे सरकार' ही घोषणा देऊन प्रत्यक्षात आणणारे गाव ही मेंढा लेखा गावाची खास ओळख आहे.

असा मिळाला या गावाला अधिकार...

आमच्या गावातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे ग्रामसभेला मिळावे. या गावाची मालकी देखील आमच्याकडेच असावी, असं तोफा यांनी सरकारकडे मत मांडलं होतं. आमच्या गावातील निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला मिळावा. याकरिता ग्रामसभा जबाबदार असावी, असेही ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याला केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय देखील सहमत झाले आणि मेंढा लेखा या गावाला त्यांचे निर्णय घेण्याकरिता ग्रामसभेचे अधिकार देण्याचा निर्णय मंत्रालयाने घेतला. 

देशातील पहिले गाव...

गावातल्या आणि भोवतालच्या वनजमिनी, वनउत्पादनांवर गावाला अधिकार बहाल करणारा 2006 चा वन हक्क कायदा अमलात आणणारे तसेच बांबू विक्रीचा अधिकार मिळणारे आणि प्रत्यक्ष बांबू विक्री करणारे हे देशातील पहिले गाव ठरले.  

सुरवातीला आल्या 'या' अडचणी...

तोफा म्हणाले, या गावासाठी काम करत असताना सुरुवातीला वनविभागाकडून अनेक अडचणी आल्या आहेत.‌ या गावातील जमीन तुमची नाही सरकारची आहे. वारंवार अर्ज देऊन काय उपयोग होणार नाही. सरकार कोणत्याही गोष्टी मान्य करायला तयार नव्हते. वारंवार कायदा दाखवत होते. असे अनेक उत्तरे वन विभागाकडून मिळत होते.  

असे आलेले गावकरी एकत्र...

तोफा म्हणाले, कोणत्याही भागात सर्व गावकऱ्यांना एकत्र आणणे कठीण. पूर्वी लोकांसाठी काम केले जायचे, परंतु आता कामं तुम्हीच करा, आम्ही मदत करू असं सूत्र असतं. पण या गावातील गावकरी जंगल, ‌जमीन, पाणी याची आपल्यालाही गरज आहेच. त्यातून आपल्यालाही रोजगार मिळेल. यामुळे सर्व गावकरी एकत्र आले.

बांबू विक्रीतून गावाला एक कोटी 15 लाख...

मेंढा लेखा गावाला 2011-12 या वर्षी बांबू विक्रीतून एक कोटी 15 लाख रुपये मिळाले आहे. या गावाला सध्या एका वर्षाला 40-50 लाख उत्पन्न मिळतात. मिळालेले उत्पन्नातून काम करणाऱ्यांना मजुरी देऊन बाकीचे ग्रामविकासाच्या कामासाठी ठेवण्यात येते. 

या गावातील जंगलात...

या गावात 4,500 एकर जंगल आहे. जंगलाची निगा गावकरी राखतात. या जंगलामध्ये गावकरी कामं करतात. गावकऱ्यांना काम केलेल्याची मजुरी मिळते पण संरक्षणाची मजुरी मिळत नाही.

या गावाची ही आहेत खास वैशिष्ट्य...

- गाव एक परिवार
- भाताचे पीक हे गावाचे उत्पन्नाचे प्रमुख साधन
- सर्व गावकरी एकत्र येऊन सामूहिक स्तरावर निर्णय घेतात.
- निर्णय प्रक्रियेला वेळ जरी लागणार असला तरीही गावातील सर्वच निर्णय सर्वसहमतीने होतात. त्यानंतरच योग्य निर्णय घेतला जातो.
- कोणत्याही उपक्रमावर चर्चा करूनच योग्य निर्णय घेतला जातो.

पूर्वीपेक्षा गावातील सद्यस्थिती...

गावक-यांची विचार करण्याची पद्धत बदलली. गावात प्रत्येकवेळी एकजूटीने निर्णय घेतले जातात. कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास करून सर्वांच्या संमतीने निर्णय ठरवले जातात. संपूर्ण गावक-यांच्यासोबत एकत्र राहून काम केले जाते. पुरुषांसोबत महिलांचाही प्रत्येक कामात तितक्याच प्रमाणात सहभाग असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com