पुढील तीन-चार दिवस विदर्भासाठी धोक्याचे; प्रादेशिक हवामान विभागाने दिला हा इशारा 

नरेंद्र चोरे
Sunday, 9 August 2020

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या पावसाळी वातावरण आहे. शहरात सकाळी साडेआठच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. काही भागांत हलक्या तर, काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या.

नागपूर  : दिवसभर झालेल्या संततधार पावसामुळे रविवारी नागपूरकरांना सुटीचा दिवस घरांमध्येच घालवावा लागला. सकाळी साडेआठपासून सुरू झालेली रिपरिप सायंकाळपर्यंत सुरूच होती. सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरात १८.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाने आणखी तीन -चार विदर्भात पावसाचा इशारा दिलेला आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात सध्या पावसाळी वातावरण आहे. शहरात सकाळी साडेआठच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. काही भागांत हलक्या तर, काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. दिवसभर सरींवर सरी सुरू होत्या. पावसामुळे जागोजागी डबके साचले होते. अनेक ठिकाणी खोलगट भागांमध्ये पाणी जमा झाले होते.

सविस्तर वाचा - प्रेमाखातर स्वीकारला मुस्लीम धर्म अन् झाली दोन मुलांची आई, तरीही प्रेम विवाहाचा करुण अंत
 

दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिल्यामुळे नागपूरकरांना रविवार सार्वजनिक सुटीचा दिवस असूनही घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे नाईलाजाने बहुतेकांना चार भिंतीच्या आड दिवस घालवावा लागला. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सरासरी तापमानात पाच अंशांची घट झाल्याने गारठा निर्माण झाला.

सायंकाळी साडेपाचपर्यंत १८.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. रविवारी गोंदिया व गडचिरोलीसह इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. दमदार पावसामुळे बळीराजाही सुखावला आहे. धानपट्ट्यातही पाऊस सुरू असल्यामुळे रोवण्यांनाही वेग आला आहे. हवामान विभागाने विदर्भात आणखी तीन-चार दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला आहे.

संपादन : अतुल मांगे 

 

सिटी ऑपरेशन सेंटरमधून आयुक्तांची नजर

सकाळपासून पाऊस सुरू असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरावर नजर ठेवण्यासाठी प्रशासकीय इमारतीतील सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये ठाण मांडले. शहरात लावण्यात आलेल्या ३६०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून शहरातील विविध भागांची पाहणी केली. समस्या दिसल्यानंतर लगेच त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी मोबाईलवरून संवाद साधून समस्या सोडविण्याच्या सूचना दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meteorological department has warned in Vidarbhas about heavy rain