दुधात पडली ‘महागाई’ची माशी

अनुप ताले
Thursday, 12 December 2019

गुलाबी थंडीत दूध उत्पादन वाढते म्हणे... पण सध्या ढेप, कडबा, कुटार, हिरवी, कोरडी वैरण, पशुखाद्याचे दर अव्वाच्या सव्वा झाले असून, दुधात जणूकाही महागाईची माशीच पडली आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढविण्यापेक्षा, सध्या मिळत असलेले दूध उत्पादन टिकवायचे कसे, हा यक्षप्रश्न पशुपालकांसमोर उभा राहाला आहे.

अकोला : हिवाळ्यामध्ये दूध उत्पादनात वाढ होत असते म्हणे...मात्र सध्या ढेप, कडबा, कुटार, हिरवी, कोरडी वैरण, पशुखाद्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. पशुंचा औषधोपचारही सामान्य शेतकऱ्यांना परवडणारा राहाला नाही. त्यामुळे यंदाच्या हिवाळ्यात दूध उत्पादनात वाढ दूरच, उलट मिळणारे दूध टिकवायचे कसे, याची चिंता दूध उत्पादकांना लागली आहे.

वर्षोगणती नैसर्गिक, अनैसर्गिक संकटांमुळे शेती नुकसानात जात असून, आर्थिक स्थिती बिकट झाल्याने हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. यावर उपाय म्हणून, शेतीपुरक व्यवसाय करण्याचा सल्ला कृषी, पशुसंवंर्धन विभाग आणि शासनाकडून देण्यात येतो. त्यामध्ये प्रामुख्याने पशुपालन शेतीला जोड असल्याने, दुग्ध व्यवसाय करण्यासाठी विशेष भर दिला जातो. त्यासाठी विविध योजनाही शासनाद्वारे हाती घेतल्या जात आहेत. परंतु, प्रत्येक शेतकरी, पशुपालक, दुग्ध उत्पादकापर्यंत त्या पोहचत नाहीत. त्यामुळे संपूर्ण खर्च उचलून व कष्टाचे रान करून, येथील पशुपालकाला दुग्ध व्यवसाय करावा लागतो. व्यवसाय टिकविण्यासाठी तसेच तो वृद्धींगत करण्यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी निवारा शेड, त्याचबरोबर मुक्त गोठा पद्धती, मिल्क मशीन, कडबा कुट्टी मशीन, अशा अनेक सुविधांवर मोठी गुंतवणूक केली आहे. त्यातूनच दुग्ध व्यवसायाला आर्थिक सुबत्ता आली आहे. मात्र, गेल्यावर्षी जिल्ह्यात पडलेला दुष्काळ आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतातून पिकांचे उत्पादनही मिळाले नाही. याचा फटका पशुखाद्यनिर्मितीस लागणाऱ्या कच्च्या मालावर झाला. परिणामी, कच्च्या मालाच्या दरात वाढ झाली असून, सातत्याने वाढ होत आहे. यामुळे मात्र पशुखाद्याच्या दरात प्रचंड वाढ झाली असून, पशुपालकांना दूध उत्पादन टिकवणेसुद्धा कठीण झाले आहे.

पशुखाद्यामध्ये झालेली दरवाढ (प्रतिकिलो)
पशुखाद्य         2018चे दर    2019चे दर
सरकी ढेप          16-18           22-25
हरभरा कुटार      05-07          10-11
सोयाबीन ढेप      25-26          35-38
शेंग ढेप             18-19          30-32
कडबा कुट्टी         10-12          18-20

उत्पादन वजा खर्च जाता उरते शुन्य
एका म्हशीला दहा किलो कुट्टी, सात किलो ढेप व औषधोपचारावर सरासरी 10 रुपये खर्च होतो. दूध विक्री/ वाहतूकीसाठी दररोज 80 रुपये व मजुरी 50 रुपये, असा दररोज एका दुधाळ म्हशीवर साधारणपणे 480 रुपये खर्च येतो आणि त्यातून सरासरी आठ किलो दूध उत्पादन मिळते. सध्याचे दुधाचे दर 60 ते 65 रुपये किलो आहेत. मात्र एका किलो दूध उत्पादनासाठीसुद्धा 58 ते 60 रुपये खर्च येत असल्याने, उत्पादन वजा खर्च जाता, दूध उत्पादकांच्या हाती काही उरत नाही.
- राम जोशी, दूध उत्पादक, कान्हेरी सरप

साठेबाजारातून पशुपालकांची कोंडी
अकोला जिल्ह्यासह राज्यभरात काही व्यावसायीक मोठ्या प्रमाणात ढेप, पशुखाद्याची साठवणूक करून साठेबाजाराचा गोरखधंदा चालवित आहेत. त्यातून पशुपालकांना वेठीस धरण्यात येत आहे आणि यामुळेच ढेपीचे, पशुखाद्याचे दर गगणाला भिडल्याच्या तक्रारीसुद्धा पशुपालकांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk production becomes expensive